Bookstruck

इंदूर 19

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गुणा बोलला नाही. तिने त्याच्या तोंडाकडे पाहिले तर अश्रु येत होते.

“काय झाले गुणा?”

तो बोलेना.

“आई, ते रडताहेत.”

“त्याला त्याच्या मित्राची आठवण झाली असेल. त्याचा मित्र जगन्नाथ सुंदर गातो. गुणा त्याला साथ करतो. दोघांचे एकमेकांवर फार प्रेम. राहून राहून त्याला मित्राची आठवण येते. परंतु काय करायचे?” रामराव म्हणाले.

“फार प्रेमळ मनाचा तुमचा गुणा.”

“आम्ही आता जातो तिकडेच झोपायला.”

“येथेच झोपा ना!”

“नको. तिकडेच जातो. देव आहेत घरांत आतां ठेवलेले.”

“बरे तर.”

तिघे जायला निघाली.

“इंदु, जिन्यातला दिवा लाव.”

इंदु पुढे गेली व तिने बटन दाबले. तिघे जिना उतरून गेली. इंदु माघारी आली. बटन तसेच राहिले.

“इंदु, बटन बंद नाही केलेस?”

“मी नाही आता पुन्हा जात. लावायला सांगितलेत, लावले.”

“अग येतांना बंद नको का करून यायला?”

“मला नाही राहिली आठवण.”

इंदु पाय आपटीत गेली व बटन बंद करून आली.

“ती सारंगी ठेव व नीज आतां.”

इंदु आपल्या खेलीत गेली. तिने ती सारंगी हृदयाशी धरली. नंतर तिने ठेवून दिली. ती झोपली. तिकडे गुणाहि झोपला. दोघांच्या मनांत शेकडो विचार येत होते. किती कल्पना, स्वप्ने, तरंग, भावना!

« PreviousChapter ListNext »