Bookstruck

इंदिरा 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

इंदिरा घरी आली. एरंडोलला आली. सासूसास-यांना आनंद झाला. जगन्नाथच्या येण्याचे पत्र त्यांनाहि आलेले होते. सासू आता इंदिरेला बोलत नसे. तिला प्रेमाने वागवी.

“इंदिरे, आता जरा नीट खा, पी. नाहीतर जगन्नाथ म्हणेल की माझी बायको वाळली. सासूने छळले असेल. पोटभर खायला दिले नसेल. जरा अंगाने नीट हो.”

“असे नाही हो ते म्हणणार.”

इंदिरेने गुणाचे घरहि झाडून ठेवले. ती गुणाची खोलीही झाडून ठेवली. तेथे नीट बैठक घालून ठेवली. जगन्नाथने तिला ते घर नेहमी स्वच्छ ठेवायला सांगितले होते.

घरासा नवीन रंग देण्यात आला. जगन्नाथच्या खोलीला सुंदर गुलाबी रंग देण्यांत आला. खोली सुरेख दिसू लागली. जणु जगन्नाथची वाट पहात ती नटूनथटून उभी होती.

आणि ते सूत विणायला गेले. विणून आले. ती खादीची धोतरे धुऊन आणण्यांत आली. किती शुभ्र हिसत होती ती! शर्टिंगहि धुऊन आणण्यांत आले. जगन्नाथच्या एका जुन्या शर्टाच्या मापाने इंदिरेने दोन शर्ट शिवून आणविले. दोन टोप्या शिवून आणविल्या. दोन हातरुमाल शिवविले. तिच्या हातच्या सुताचे ते सारे होते. आणि त्या रुमालांवर तिने जगन्नाथचे एका कोप-यांत नाव गुंफले.

केव्हा येईल जगन्नाथ? केव्हा त्याला या वस्त्रांनी नटवीन? केव्हा हा खादीचा मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवीन, हा हातरुमाल त्याच्या हातात देईन? तिने त्या हातरुमालाला तेलाचा वास लावून ठेवला. जणुं हृदयांतील प्रेम त्यांत भरून ठेवले. इंदिरा अशी तयारी करीत होती आणि जगन्नाथ काय करीत होता?

« PreviousChapter ListNext »