Bookstruck

जगन्नाथ 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“होय. समजून घेईन. दयाराम भारती म्हणत तुम्ही संगीत शिकतां—गरिबांच्या जीवनांत संगीत आणा. त्याच्या जीवनाच्या तारा सर्व तुटल्या आहेत, भोपळा फुटला आहे. जीवनांत संगीत निर्मील तोच खरा कलावान्.”

“असे कलावान्तुम्ही होणार आहांत का?”

“कोणी करील तर होईन.”

“कोण करणार?”

“मी तरी काय सांगू?”

“तुम्ही डोळे उघडे ठेवा म्हणजे आपोआप व्हाल. एखाद्या सावकाराने शेती परत करून प्रश्न थोडाच सुटणार आहे! ही समाजरचनाच बदलली पाहिजे. जमीनदारांची, स्वत: न कसणा-यांची जमीन काढून घेतली पाहिजे. दहा एकर, पंचवीस एकर जमीन फार तर एकाजवळ ठेवावी. बाकी काढून घेऊन शेतक-यांस द्यावी. ज्यांना जमीन नाही त्यांना द्यावी. सहकारी सामुदायिक शेती करण्याच्या अटीवर द्यावी. अशासाठी संघटना हवी. या गोष्टी करा. क्रांतीचीं गाणीं गा. तिचा प्रचार करा.”

“मी व माझे मित्र असा प्रचार करीत होतो. मेळे करून गांवोगांव गेलो, खेड्यापाड्यांतून गेलो, खूप परिणाम होई.”

“परंतु त्या मेळ्यांतून नुसती रडारड दाखविली असेल. अन्यायाविरुद्ध शेतकरी उभे राहून, लाल झेंडा हाती घेऊन प्रतिकार करू लागत आहेत असें दाखवलेत का? इतर सारे देव भिरकावून हा संघटनेचा नवीन देव घ्या; असे सांगितलेत का?”

“नाही. ती दृष्टी तेव्हा नव्हती.”

“ती घ्या. क्रान्तिकारक व्हा. श्रीमंत तरुणांनी आधी व्हावे, पूर्वजांची पापे धुण्यासाठी तरी व्हावे, प्रायश्चित्त म्हणून तरी त्यांनी या गोष्टी आतां कराव्या.”

“इतक्यांत वडिलांनी कावेरी, कावेरी, म्हणून हाक मारिली. ती गेली. जगन्नाथ चकित होऊन बसला. ही मुलगी की पेटती ज्वाला! पिता संगीताची शाळा घालून बसला आहे व मुलीने जीवनांतील संगीताचा वर्ग उघडला आहे. श्रमजीवींच्या जीवनांत संगीत कसे आणावे हे ही मुलगी शिकवू पहात आहे. तिचे डोळे कसे विजेप्रमाणे चमकत, तोंड कसें सात्त्विक संतापाने पेटल्यासारखे वाटे. त्या गच्चीत जगन्नाथ हिंडू लागला, विचारांत तन्मय झाला.

सायंकाळ होत आली. गायनाचा वर्ग सुरू होणार होता. जगन्नाथ गेला. त्या दिवानखान्यांत त्यागराजांचे भव्य तैलचित्र होते. जगन्नाथने त्याला प्रणाम केला. इतर आलेल्या विद्यार्थ्यांसही त्याने प्रणाम केला. पशुपतींनी ओळख करून दिली. महाराष्ट्रीय, महाराष्ट्रीय असे ते कुजबुजू लागले. पुणे, पुणे असे एकमेकांस सांगू लागले. जगन्नाथने एकदोन गाणी म्हटली, सर्वांना ती आवडली.

« PreviousChapter ListNext »