Bookstruck

जगन्नाथ 19

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आणि तिसरे प्रहरी एक मैत्रीण आली छुप्पा कॅमेरा घेऊन. जगन्नाथने कपडे केले.

“जरा हसरे तोंड ठेवा. इतके गंभीर नको.” कावेरी म्हणाली. पटकन् फोटो काढून झाला. ती मैत्रिण गेली.

“कावेरी, फोटो कशाला?”

“एखादे वेळेस पळून गेलेत तर? तर मग वर्तमानपत्रांत तुमचा फोटो देईन व हा हृदयचोर पकडून देणारास मागेल तितके पैसे बक्षीस अशी जाहिरात देईन. यासाठी हा फोटो.”

“परंतु मी जाणार नाही.”

“येथे का जन्मभर राहणार आहांत?”

“कावेरी, आपण जाऊं.”

“कोठे जायचे?”

“जाऊ भिकारी होऊन. लहानपणापासून मला हेच डोहाळे होताहोत. भिकारी व्हावे. मी गुणाला म्हणत असे की आपण भिकारी होऊन हिंदुस्थानभर हिंडू. गुणा सारंगी वाजवता व मी गायलो असतो. परंतु गुणाऐवजी तू आतां चल. परंतु तुला सारंगी येत नाही.”

“सारंगी नसली तर नसली. पेटी चालेल. तुम्हांला पेटी येते. पेटीच वाजवा व गा. गळ्यांत अडकवा. मी तुमच्या खांद्यावर हात ठेवून उभी राहीन. कृष्णाजवळ जणुं राधा.”

“खरेच जायचे का आपण? जाऊ? येशील?”

“बघूं पुढें.”

आणि हिंदी परीक्षा झाली. जगन्नाथ त्या परीक्षेला बसला. आणि खरोखरच ते पहिला आला. कावेरीस आनंद झाला.

“आलेत ना पहिले?”

« PreviousChapter ListNext »