Bookstruck

जगन्नाथ 23

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कावेरीला आतां त्या घरांत कोणते बंधन होतें? तिची सावत्र आई, सावत्र भावंडे. सावत्र आईचे भाऊ सारी व्यवस्था पहायला आले. कावेरीला कोण विचारणार, कोण पुसणार? तिचा पदोपदी अपमान होऊ लागला. ती कावरीबावरी झाली. जगन्नाथ कधी सुटतो याची ती वाट पहात बसली.

परंतु जगन्नाथ येईल का येथे? येईल. मला भेटल्याशिवाय जाणार नाही. तिला आशा होती.

जगन्नाथ एके दिवशी सुटला. सुटल्यावर त्याने आधी घरी पत्र पाठविले. इंदिरेला पत्र पाठविले. मी लौकर येतो असे त्याने लिहिले. घरी जाणे हे पहिले कर्तव्य. बाकी मोहपाश तोडणे प्राप्त होते. परंतु कावेरीला भेटायला हवे. गुरुंचा आशीर्वाद घएऊन जाणे हेहि कर्तव्य होते.

तो कांचीवरम् येथे आला. गुरुगृही गेला. तो तेथे सारा दु:खद प्रकार. तो स्तंभित झाला. त्याला रडू आले. तो आपल्या खेलीत गेला. तेथे कावेरी आली. ती रडत होती.

“उगी, रडूं नको.”

“मला आतां कोण आहे? तुम्ही या कावेरीला कावेरी नदीत लोटा व घरी जा. तुमच्या सुंदर हातांनी या दुर्दैवी कावेरीचे जीवन पुसून टाका. मला कोण आहे? प्रेमहीन जगांत का एकटी राहूं?”

“मी आहे तुला.”

“तुम्ही माझे नाही. तुम्ही दुस-याचे आहांत. जगन्नाथ, तू नाही हो माझा.”

“आहे. मी आधी तुझा आहे. मग इंदिरेचा, मग सर्वांचा. आधी तुझा पहिला हक्क. तू दिसली नव्हतीस तोपर्यंत इतर येत होते माझा कबजा घ्यायला. परंतु तू सहजपणे आलीस. जणुं शतजन्मांची माझी मालकीण. चल, कावेरी, आपण जाऊं.”

“कोठे जायचे? कावेरी भिकारी आहे. बाबा आतां नाहींत. मजजवळ काय आहे?”

“आपण भिकारी होऊन हिंडू. परस्परांचे प्रेम लुटूं व भारतमातेची यात्रा करूं. खरेच जाऊ. देवाची तशी इच्छा दिसते.”

आणि एके दिवशी जगन्नाथ व कावेरी खरेच बाहेर पडली. यात्रेला निघाली. हातांत हात घेऊन बाहेर पडली. इकडे इंदिरा वाट पहात होती. खेलीला गुलाबी रंग देऊन वाट पहात होती. आईबाप आशेने वाट पहात होते. परंतु कावेरी व जगन्नाथ प्रेमयात्रा करीत, गाणी गात, भिकारी होऊन हिंडत होती!

« PreviousChapter ListNext »