Bookstruck

इंदु 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“आहे. पुष्कळ पद्धति आहेत. इंदु, तू पुढे काय शिकणार?”

“काय शिकूं.”

“काही तरी उपयुक्त विद्या शीक.”

“तुझ्यासारखी डॉक्टर होऊं?”

“तुला आवडतो का अभ्यास?”

“गुणाला आवडतो, मग मलाहि आवडेल.”

“तू नर्सिंगचा कोर्स घे. सूतिकावर्गाचे शिक्षण घे.”

“आधी मॅट्रिक होऊं दे. मग पुढे बघेन.”

गुणा डॉक्टरीचा अभ्यास करूं लागला. त्याला आतां फारसा वेळ मिळत नसे. सकाळची गुणवंतरावांकडची शिकवणी त्याने सोडून दिली. त्याला नादारी मिळाली होती. तो काटकसरीने वागे. तो साधा खादीचा शर्ट व खादीची पॅन्ट घालूनच वर्गांत जात असे. इतर मुले त्याला हंसत परंतु तो लक्ष देत नसे.

“गुणा, तूं नेटनेटका कां नाही पोशाख करीत?” इंदूने विचारले.

“या पोषाखांत का मी वाईट दिसतो?”

“कोणत्याहि पोषाखांत तू मला चांगलाच दिसतोस.”

“मग?”

“विश्वासराव म्हणत होते की काय दरिद्र्यासारखा राहतो? डॉक्टर म्हणून कोण ओळखील?”

« PreviousChapter ListNext »