Bookstruck

इंदु 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“परंतु आईने घरी करून ठेवले असेल.”

“जाऊ दे ते फुकट. मी येईन सकाळी शिळे खायला.”

“रहा हो आज. तुला आई रागावणार आहे थोडीच! आतां तुम्ही मोठी झालींत मुलें. तुमच्यावर रागवायला आतां संकोच होतो.” मनोहरपंत म्हणाले.

गुणा आज इंदूकडेच जेवायला राहिला. तिला खूप आनंद झाला होता. ती आज किती तरी जेवीत होती.

“इंदु, आतां पुरे हो पोळी.” आई म्हणाली.

“आई, मला का उपाशी ठेवतेस?”

“मी आयत्या वेळी आलो म्हणून घोटाळा.” गुणा म्हणाला.

“तसे नाही गुणा. ही रोज अर्धी पोळी खाते. आज तिच्या पोटांत का राक्षस उठला आहे?”

“इंदु, जेवल्यावर आमच्याकडे चल. म्हणजे उरलेले पोट तिकडे भरेल. तूं आलीस म्हणजे आई मला रागेहि भरणार नाही.”

“आई, जाऊं का गुणाबरोबर?”

“जा, पण जेवूं नको हो. आजारी का पडायचे आहे?”

“रोज म्हणतेस नीट जेवत तरी जा. आज म्हणतेस जेवूं नको.”

“इंदु, सारे प्रमाणांत हवे.”

“आज मला लागली भूक. यांचे गाणें ऐकले म्हणजे भूक लागते. आतडीं जणु ओढतात.”

“इंदु, बंकिमचंद्र होते ना, ते म्हणत की ज्या दिवशी माझ्या कादंबरीतील अत्यन्त उत्कृष्ट भाग मी लिहीत असे त्या दिवशी मी रोजच्यापेक्षा चौपट खात असे.”

“तुमची सारंगी ऐकण्यांत मी बंकिमचंद्र आहें एकूण.”

जेवणे झाली. गुणा जायला निघाला.

« PreviousChapter ListNext »