Bookstruck

इंदु 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“चल गुणा, मला पोचव.”

“जा एकटी. शहरांत राहणारी तू. अशी कशी भित्री?”

“एरंडोलला राहणा-यांच्या संगतीमुळे भित्री बनल्ये.”

“बरे चल.”

इंदु व गुणा गेली.

“माझा हात धर गुणा.”

“तूं का लहान आहेस इंदु?”

“धर ना रे. नाहीतर मीच तुझा धरते.” असे म्हणून इंदूने गुणाचा हात हातांत घेतला.

इंदूचे घर आले.

“जा आतां गुणा. तुझ्या घरी जा.”

“तुझे घर तेंच माझे घर.”

“तुझे घर एरंडोलला आहे.”

“माझे घर तुझ्या हृदयांत आहे.”

“खोटे बोल. मी आपली जाते. तू जा एकटा.”

“बायका अशाच फसव्या.”

“मी आधीच सांगितले होते की तुला एकट्याला जावे लागेल.”

“मी आधीच म्हटले होते की मला एकट्यालाच परतावे लागेल.”

दोघांना तेथे बोलत उभे राहावे असे वाटत होते. शेवटी गुणा माघारा गेला.

इंदु व गुणा यांचे परस्परांवर प्रेम होते. सर्वांच्या लक्षांत ती गोष्ट आली होती. इंदूची आई एके दिवशी म्हणाली.

“इंदु व गुणा यांचे लग्न तरी करून टाका.”

“मी ठरवून ठेवले आहे.”

“केव्हा?”

“त्याला आगगाडींत प्रथम पाहिला तेव्हा.”

“खरेच?”

“खरेच. आपली इंदु पुढे या ध्येयवादी तरुणाला द्यावी, आईबापांबरोबर वनवास पत्करणा-यास द्यावी, त्यांच्यासाठी भिकारी होणा-यास द्यावी, असे त्या वेळेसच मला वाटले. म्हणून मी त्याला बोलावले. जणुं त्या दिवसापासूनच मी त्याला घरजावई केले आहे. आणि इंदूने तो आला त्याच दिवशी त्याला माळ घातली आहे.”

« PreviousChapter ListNext »