Bookstruck

इंदु 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“तू बरी होऊन येशील. मग क्षयरोग्यांसाठी आपण मोठे रुग्णालय काढूं. तेथे निसर्गोपचारावर भर देऊं हो!”

“गुणा, तुझा हात बघू?”

गुणाने आपला हात तिच्या हातीं दिला.

“हा माझा आहे हात.”

“आणि तुझा हात माझा.”

“क्षयरोगी मुलीचा हात? गुणा, मला नेहमीं असेच अंथरुणावर पडून रहावे लागले तर? कायमची अशी दुखणेकरीण झाले तर?”

“मी तुझी कायमची सेवा करीन. तुझ्याजवळ सारंगी वाजवीन. तुझ्या पडण्यापासूनहि मला स्फूर्ति मिळेल. तूं अंथरुणावर पडून असलीस तरी तूं प्रेम देत राहशील. तुझे गोड हसणे, गोड बोलणे, प्रेमळ डोळे, यांवर मी जगेन. तुझा हात हातांत क्षणभर असा धरीन. मला सारे मग मिळेल.”

“गुणा, मी बरी होणार आहे. अंथरुणावर नाही हो पडून राहणार. बरी होईन. तुझ्या सेवेत मदत करीन.”

“ये. बरी होऊन ये.’

मनोहरपंत, इंदु व इंदूची आई सारीं निघून गेली. निरोप घेतांना गुणा व इंदु यांचे डोळे भरून आले. गाडी निघून गेली तरी इंदूचे डोळे खिडकीबाहेरच होते. गळत होते.

“इंदु, ये पडून रहा बाळ.” पिता म्हणाला.

“बाबा, मला बरी करा हो. नाहीतर गुणा जन्मभर दु:खी राहील.” ती कांप-या आवाजांत म्हणाली. मनोहरपंत काही बोलले नाहीत. इंदूला त्यांनी झोपविले. तिच्या डोक्यावर थोपटीत बसले.

गुणा आता इंदूच्या घरीच रहायला आला. सारींच आली. तो इंदूच्याच खोलीत बसे. त्याने खाट उन्हांत टाकली काही दिवस. खोलीला नवीन रंग देण्यांत आला. स्वच्छ साधी खोली. तो खोलींत धूप जाळी. सुगंधी चंदन जाळी. जणुं प्रेमदेवतेची पूजा करी. इंदूची उशी उशाला घेई. सुंदर वेल भरलेली उशी! वेलीवर पाखरूं भरलेले होते. उडून जाऊं पाहणारे पांखरूं. इंदु का अशीच माझ्या जीवनाच्या वेलीवर क्षणभर बसायला आलेली आहे? ती का उडून जाईल? क्षणभर वेलीला नाचवून व हालवून ती का निघून जाईल? तो त्या उशीवरील पाखराकडे बघत बसे व म्हणे, “हे पांखरूं उडून नाही जाणार. हे कायमचें राहील.”

« PreviousChapter ListNext »