Bookstruck

इंदु 20

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आणि उत्तर आले.

“प्रिय पतीच्या मित्रांस प्रणाम.

तुमचे मित्र येथे नाहींत. किती दिवस झाले त्यांचे पत्र नाही. पत्ता कळत नाही. ते दक्षिणेकडे म्हणून गेले. मी काही दिवस आश्रमांत होते, त्यांनीच मला ठेवले. परंतु मी आश्रमांत असतांच ते निघून गेले. प्रथम त्यांचे पत्र येई. लौकर येतो, असेहि एकदां पत्र आले. परंतु त्या गोष्टीलाहि दोन वर्षे झाली. कोठे तुरुंगात तर नाहीत? एकदा तिकडे तुरुंगवास त्यांना झाला होता. हरिजनांबरोबर त्यांनी सत्याग्रह केला म्हणून. कोठे असतील बरे ते? त्यांचे आईबाप दु:ख करीत आहेत. आणि माझी मन:स्थिति मी कशी लिहूं?

तुमच्या का शोधासाठी ते गेले? तुमच्यासाठी त्यांना फार वाईट वाटे. तुमचे घर रोज झाडून ठेववीत. आणि तुमच्या खोलींत रोज जाऊन बसत. तुमचे एक मोठे तैलचित्र तुमच्या खोलीत त्यांनी टांगले आहे. त्या चित्रासमोर बसत व गाणे गात. त्यांचे कधी पत्र येई त्यांतहि गुणाची खोली स्वच्छ ठेव, त्याचे घर झाडून ठेव. तो रात्री गेला, रात्री एखादे वेळेस येईल. घर स्वागतार्थ स्वच्छ असू दे, असे असे. तुम्ही या. तुमचे घर आहे. तुमचेच कुलूप आहे. तुम्ही आलेत म्हणजे ते येतील अशी मला आशा आहे. त्यांच्या हृदयाला कळेल की आपला मित्र आला. तुम्ही या. माझ्यासाठी तरी या. त्यांच्या वृद्ध मातापित्यांना धीर द्यायला तरी या. तुमच्या सर्व मित्रांस प्रणाम.

तुमच्या मित्राची पत्नी,
इंदिरा.”


गुणाने ते पत्र वाचले. त्याचे डोळे भरून आले. जगन्नाथचे आपल्यावर किती प्रेम! सारे सारे त्याला आठवले. तो एकेक आठवणी इंदूला सांगू लागला.

“इंदु, मी जाऊ का त्याला शोधायला?”

“कोठे जाणार तुम्ही? इंदिरा रडत आहे, इंदुहि रडत बसावी अशी का तुमची इच्छा आहे? तुम्हां मित्रांचे होतील खेळ. आम्ही दोघी रडत बसूं.”

“मग काय करायचे?”

“आपण तुमच्या एरंडोलला जाऊं, म्हणजे तुमचा मित्र परत येईल.”

“तुला इंदूर सोडून कसे येववेल?”

“मुलगीला माहेर सोडावे लागते. आपली मुलगी आपणांस सोडून जाणार हे आईबापांस माहीत असते.”

“परंतु तुझ्या आईबापांनी निराळी व्यवस्था योजल्याप्रमाणे दिसत आहे. मी इंदूरलाच रहावे अशी त्यांची इच्छा आहे.”

“परंतु तुमच्या वडिलांना सारखे एरंडोल आठवतें. ते घर आठवते. तुम्हांलाहि आठवणी येत असतील. तुमचा मित्र आज ना उद्या येईल. तो एरंडोललाच राहणार. आपण एरंडोललाच पुढे जाऊ.”

“पुढे म्हणजे केव्हां? त्या माझ्या मित्राच्या पत्नीस काय उत्तर लिहूं?”

« PreviousChapter ListNext »