Bookstruck

इंदु 23

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कोण पाहिजे आपणांला?”

“ते सारंगी वाजवणारे.”

“बसा. थोड्या वेळाने ते येतील.”

क्षितिमोहन बाबू तेथे एका लोडाशी बसले. पेशवाई थाटाची तेथे बैठक होती. थोड्या वेळाने गुणा आला.

“आपण माझ्याकडे आला आहांत?” त्याने विचारले.

“हो. तुम्हांला विचारायचे आहे.”

“काय?”

“तुम्ही माझ्या घरी येऊन सारंगी वाजवाल का? माझी मुलगी फार आजारी आहे. कदाचित् तिला बरे वाटेल. काही रोग संगीताने बरे होतात. याल का? मी गरीब आहे. तरीहि तुम्हांला काही देईन.”

“मला काही नको. मी येईन. आतां येऊ?”

“हो चला. आभारी आहे.”

“आभार कसचे त्यांत?”

गुणा क्षितिमोहन बाबूंबरोबर त्यांच्या बि-हाडीं गेला. कुमुदिनी अंथरुणावर पडलेली होती. मच्छरदाणींत होती. तळमळत होती.

“कुमुदिनी, ते आले आहेत हो सारंगी वाजवणारे!”

“बघू दे त्यांना. ही मच्छरदाणी वर करा.” मच्छरदाणी वर करण्यांत आली. कुमुदिनीने पडल्या पडल्या प्रणाम केला. गुणा गोंधळला.

“वाजवा. मी ऐकतें.” ती हलक्या सुरांत म्हणाली. आणि गुणा सारंगी वाजवूं लागला. चाळींतील मंडळी गॅलरींत जमली. ही गर्दी! परंतु गडबड नव्हती. ते संगीत शांत करणारे होते. दोन तीन राग आळवून शेवटी भैरवी त्याने आळविली. कुमुदिनीच्या डोळ्यांतून टपटप पाणी गळूं लागले.

“पुरे ना आहां?” गुणाने विचारले.

“पुरे. येत जा एखादे वेळेस. मी बरी होईन. रोग कायमचा बरा होईल.”

“येईन हो. जातो मी.”

“थांबा, चहा घ्या.”

गुणा चहा घेत नसे. परंतु तो बोलला नाही. त्याने आज तेथे चहा घेतला. तो निघाला. क्षितिबाबू पोचवायला गेले.

« PreviousChapter ListNext »