Bookstruck

इंदु 31

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“आई, शिकलेल्या मुलीने अधिकच मनापासून केले पाहिजे काम. आनंद मानून केले पाहिजे. अशिक्षिताला कामाचा बोजा वाटत असेल तर सुशिक्षिताला त्यांत आनंद वाटला पाहिजे. एके दिवशी घरी आई मला केर काढायला सांगत होती. मी नाही म्हणत होते. गुणा येत होता. त्याने ते ऐकले. तो मला म्हणाला, ‘जा आधीं केर काढ. शिकलेल्या मुली कामाला कंटाळतात हा डाग तुम्ही धुऊन काढला पाहिजे.’ ते शब्द मी विसरणार नाही.”

“किती तुझे थोर मन.”

“तुमच्या गुणाने केले हो. त्याच्याजवळ सारंगी नीट वाजवायला नाही शिकल्ये. परंतु नीट वागायला शिकल्ये. लोकांच्या भावना ओळखायला शिकल्ये. गुणाने मला जीवनाचे शिक्षण दिले. जीवनाची सारंगी वाजवायला त्याने शिकविले.”

“कसे गोड बोलतेस तूं.”

“हे मी नाही बोलत आई.”

“मग कोण बोलत आहे?”

“हृदयांतील वेणु वाजवणारा, सारंगी वाजवणारा गुणा. तो माझ्या ओठांतून बोलत आहे हो.”

इंदूच्या आईला अलीकडे जरा बरे वाटत नव्हते.

“इंदु, काहीं दिवस इकडेच राहा.”

“होय हो आई!”

इंदु आईची सेवा करीत होती. परंतु एकदम अकस्मात् दुखणे विकोपाला गेले. आणि इंदूची आई देवाघरी गेली. इंदूचे सांत्वन गुणाची आई करीत होती. परंतु दैवाचा आघात अद्याप संपला नव्हता. इंदूच्या आईचे दहन करून मनोहरपंत घरी येऊन बसतात तोच त्यांच्या हृदयांत कळ आली व तेहि एकदम इंदूला सोडून गेले.

« PreviousChapter ListNext »