Bookstruck

एरंडोलला घरीं 8

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कोणता अर्थ?”

“अरे, हिंदुमंदिरांचा कळस म्हणजे सारा पसारा सोडून उत्तरोत्तर मुक्त होत जाणारी, परमात्म्याला मिळूं पाहणारी जणुं पवित्र आत्मज्योत. ईश्वराकडें जायचें असेल तर हे बाह्य फाफट पसारे सोडून, यांतून आत्मा काढून घेऊन तो ईश्वराकडे वळवा; दृष्टि वरती लावा; सूर्याकडे लावा; परमज्योतीकडे लावा; असें जणु हा कळस सुचवीत आहे. आणि मुसलमानांचा घुमट म्हणजे जणुं आकाशाची प्रतिकृति. ईश्वरानें विश्वव्यापक गोलघुमट मशीद उभआरली आहे. हा आकाशाचा घुमट बघ. केवढी भव्य ही प्रभूची मशिद. त्या मशिदीची आठवण लहान मशिदीत ठेवायची. जणुं प्रभूच्या आकाशाखाली उभे आहोत, सर्व पृथ्वीवरच्या बंधूशी एकरूप होत आहोत अशी लहानशा मशिदीच्या घुमटाखालीही कल्पना करायची, भावना करायची. सुंदर कल्पना. जगन्नाथ, सा-या कला प्रतीकात्मक आहेत. मानवी संकृति प्रतीकात्मक आहे. आपल्या या लहानशा शरिरांत आत्मा भरलेला आहे, त्याप्रमाणें आफण लहानशा वस्तूंत, लहानशा चिन्हांत अनंत अर्थ भरतो. जगन्नाथ, तामीळ भाषेतील तो तिरूक्कुरलचा कर्ता तुला माहीत आहे ना?”

“तिरूवल्लाय ना?”

“हो. त्याच्या कुरलची ख्याति आहे का तुला माहित ? मोठ्या शब्दांत अपार अर्थ तो आणी. टीकाकार म्हणतात, मोहरी पोखरून तीत सिंधु भरावा तसें तिरूवल्लाय करतो.
सा-या प्रतीकांचे असेच आहे. लाल झेंडा. केवढा अर्थ त्यांत सामावलेला आहे. मागील बलिदान व पुढील उज्ज्वल भविष्य या लाल झेंड्यांत समाविष्ट आहे.”

“कसें तूं छान बोलतेस कावेरी? तूं क्रांति करणारी आहेस. अशी भिकारीण काय बनलीस?”

“प्रेमाची शतजन्मांची तहान भागवून घेण्यासाठी. ही तहान भागली की मग मी क्रांतीसाठी उठेन हो राजा.” असें म्हणून ती जगन्नाथला हृदयाशी धरी.

एकदां दोघे श्रीरंगला जात होती. गोष्टी चालल्या होत्या.

“जगन्नाथ, श्रीरंगमधील मूर्तीचे दर्शन घेण्याकरितां एकदां एक हरिजन संत वेडा झाला. तो रंगा रंगा करीत निघाला. सनातन्यांनी त्याला अडविलें. तो म्हणाला, ‘देवानें बोलावलें असेल तर या आगीतून जा. शुद्ध होऊन जा. तूं अपवित्र आहेस. पवित्र होऊन जा.’ सनातनी म्हणाले. त्याने आगीत उडी घेतली. हसत उडी घेतली ! लोक चकित झाले. अशा अग्निदिव्यानेंहि सनातनी जागे झाले नाहीत. हे जागे होणार तरी कधी ? असे कसे हे सनातनी दगड. इरसाल दगड. हरिजनाला म्हणाले पवित्र होऊन जा. आणि हे का सारे पवित्र ? विषयभोगांत बरबरटलेले किडे ! हे भोगी किडे का पवित्र ? जगन्नाथ, द्राविडी जनतेस खरा धर्म हरिजनसंतांनी शिकविला आहे. हरिजनांत जितके संत झाले तितके अहंकारी वरुष्ठ वर्गात झाले नाहीत. परमेश्वर नम्रतेजवळ आहे, अहंकाराजवळ नाही.”

“श्रीरंग नांव मला आवडते. मी कावेरी रंग आहे, नाही ? कावेरीच्या प्रेमानें रंगलेला. कावेरीचा देव.”

“कावेरीचा दास, कावेरीचा गुलाम.”

“देव बंदा गुलामच असतो. बळीच्या दारांत तो उभा आहे.”

“जगन्नाथ, तूं हल्ली सुखी आहेस?”

“होय. सुखाच्या स्वर्गात  मी आहे.”
“आणि मी गेल्ये तर? तुला सोडून गेल्ये तर? मी मेल्ये तर?”

“तर काय?”

“तूंहि मरशील? तुझे प्राण आपोआप गळून जातील?”

“मी काय सांगूं कावेरी? तूं मला प्रश्न नको विचारूंस. प्रश्नांनी मी घाबरतों.”

« PreviousChapter ListNext »