Bookstruck

एरंडोलला घरीं 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तिनेहि उडी घेतली. दोघे पाण्यांत बुडून नाचू लागली व खेळू लागली. कावेरी वर येई तो जगन्नाथ खाली असे; तो वर येई तो कावेरी पाण्याखाली असे. एकाच वेळी दोघांची डोकी पाण्यावर येईपर्यंत बुडबुडी खेळायचे ठरले होते. शेवटी पाण्यांत कावेरीचा हात जगन्नाथने पकडला व दोघे एकदम वर आली. जणुं दोन कमलेच वर आली.

“पुरे आता.” कावेरी म्हणाली.

“दमलीस ना?” त्याने विचारले.

“मजजवळ ओझे आहे. तुझ्या प्रेमाचे गोड ओझे.” ती म्हणाली. दोघें बाहेर आली. कावेरी उन्हांत केस वाळवीत बसली होती. जगन्नाथ फुले गोळा करायला गेला. रानफुले. तो एकदम घाबरून तो आला.

“काय रे जगन्नाथ?”

“सर्प. काळा सर्प.”

“कोठे आहे?”

“गेला.”

“उचलून आणून माझ्या गळ्यांत घालायचास. इंद्रनीळ मण्यांचा हार झाला असता. तुझे खरे प्रेम माझ्यावर असते. तर तो सर्प तुला हार वाटला असता. त्याची फणा म्हणजे सुंदर फूल वाटले असते. प्रेमाला सर्वत्र मंगलता दिसते. तुलसीदास सापाला दोरी करून चढला. साप त्याला चावला नाही.”

“कावेरी, माझ्या प्रेमाचा मला अहंकार नाही. आज तरी तुझ्यासाठी मी सारे सोडले आहे. इंदिरा सोडली आहे, ध्येय सोडले आहे. सारे सोडले आहे.”

“याची आठवण आहे तुला? याची आठवण येते ना? प्रेमाला दिलेल्या किंमतीची आठवण येणे म्हणजे पस्तावणे.”

“कावेरी, दक्षिणेकडे हरिजनांत संत झाले, परंतु वरिष्ठ वर्गात घटपटादि लटपटी करणारे आचार्य झाले. तू प्रश्न विचारतेस परंतु प्रेमाला प्रश्न विचारता येत नाही. तुझेहि मजवर प्रेम नाही.”

“परंतु संतांची नावे दुनियेला माहीत नाहीत. शंकराचार्यांचे नांव जगाला माहीत आहे. वेदावर भाष्ये लिहिणारे सायणाचार्य व ते सर्वज्ञ माधवाचार्य यांची नावे दिगंत गेली आहेत. सायणाचार्य न होते तर वेदांचा अर्थ कोणाला लागता? या आचार्यांमुळे भारताची मान उंच आहे.”

« PreviousChapter ListNext »