Bookstruck

एरंडोलला घरीं 13

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“काय करीत ?”

“अंधा-या रात्री सरकारी अधिकारी लोक आसपास नाहीत असे पाहून खा-या जमिनी जिभेनें चाटून येत.”

“अरेरे, काय ही दशा !”

“तरी हिंदुस्थान शांत आहे. दुनियेत अशी शांति असेल का कोठें ? सारे स्मशान या हिंदुस्थानचें झालें.......जातीजातीत भांडणें लागली. धर्माधर्मांत भांडणें लागली. भाषाभाषांत भांडणें लागली.
बेकारीचे व कारकुनीचें शिक्षण. प्रांताप्रांतांतील सुशिक्षित भिका-यांत भांडणें लागली. धंदे गेले. व्यसनें बळावली. हिंदुस्थानचें स्वरूप, महान् मंगल स्वरूप तें छिन्नभिन्न झालें. परकी सत्तेने काय हे केलें !”

“परंतु आपण करूं दिलें म्हणून ना ? पापाला आपण बळी कां पडलों ? त्यांना कशाला बोल ? बोल आपल्या लोकांना. आपण भुललो. घटोत्कची मायेस भुललो.”

“जसा तूं मला भुललास. मी तुझे वाटोळें केलें. तुला ध्येयहीन केलें. चारित्र्यहीन केलें. कुटुंबातील प्रियजनांपासून दूर आणून कुत्रा करून फिरवीत ठेवलें.”

“कावेरी, काय हें बोलतेस ?”

“खरें नाही ?”

“प्रेमाच्या राज्यांतत सारे पवित्र आहे.”

“प्रेम कर्तव्याचें असावे, मोहाचें नसावें.”

“प्रेमापाठीमागें जाणे हेहि कर्तव्य नाही का ?”

“जगन्नाथ, आतां हिंडणें पुरे गड्या. मा थकून जात्यें. आपण कोठें तरी राहूं.”

“एक दोन मोठ्या शहरांत हिंडूं. पैसे मिळवूं. मग राहूं.” कांही दिवसांनी ती दोघें मद्रास शहरांत एका पथिकाश्रमात राहिली. कावेरीचे दिवस भरत आले होते. ती शांत पडून राही. जवळ जगन्नाथ बसे.

“जगन्नाथ, बाळंतपणात मी मेले तर ?”

असें नको बोलूं. सारे चांगले होईल. सुंदर बाळ जन्माला येईल.”

“ते गोरें असेल की काळें ?”

“गोरें असेल.”

« PreviousChapter ListNext »