Bookstruck

ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कवेरी, गेलीस. बाळ तूंहि गेलास. कां रे मला सोडून गेलीत ? मी का तुमचा नव्हतों ? तुम्ही गेलीत. मला कां ठेवलेंत ? मी पण टाकूं का चंद्रभागेत उडी ? काय करूं ?”

तो शेवटी उठला त्यानें प्रेमाच्या देहाचें कोमजलेलें फूल चंद्रभागेच्या फेसाळ पाण्यावर सोडलें ! त्याने कावेरीला उचललें. आणि तिला हलक्या हातांनी त्याने चंद्रभागेंत सोडून दिले. देहाच्या सर्व अस्थि गंगेत त्याने अर्पण केल्या. आणि थरथरत त्या चंद्रभागेत्या तीरावर तो उभा होता. कावेरी व प्रेमा यांचे देह दिसतात का हें तो पहात होता त्यानें डोळे मिटून घेतले. तो हात जोडून उभा राहिला. आणि पुन्हां---

“हे जीवन म्हणजे काय कळेना हाय ।।”

असें गाणें म्हणूं लागला. माझा मार्ग कोणता  मी जगूं की मरूं ? कावेरीच्या पाठोपाठ जाऊं का मागें राहूं ? क्रान्तीसाठी, इंदिरेसाठी राहूं ?
कोणते कर्तव्य ? कशांत आहे प्रेम ? कावेरी म्हणाली जग. तिच्या प्रेमाचा का तो आदेश होता ? परंतु तिने मला जगण्यास सांगणे हा तिच्या प्रेमाचा मोठेपणा व मी तिच्या पाठोपाठ जाणें यांत माझ्या प्रेमाचा मोठेपणा. काय करूं मी ? कोणता मार्ग ?

“जो श्रद्धा आहे तिळभर धावत ये रघुराय ।।” असें त्यानें म्हटलें.
आणि एकदम कोण तेथे धावून आलें ? कोणी तरी धावत आलें. जगन्नाथ चमकला. तो उडी घेणार तो कोणी तरी त्याला धरलें.

“कोण ?”

“जगन्नाथ, जगन्नाथ !”

“गुणा, गुणा !”

दोघे मित्र परस्परांस भेटले. त्यांना बोलवेना. एकमेकांस सोडवेना.

“गुणा, मला दाऊं दे.”

“कोठें जातोस आतां ?”

“या चंद्रभागेत जाऊं दे.”

« PreviousChapter ListNext »