Bookstruck

शेवटी सारे गोड होतें 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“त्यांतच मौज आहे असे तू म्हणालास ना?”

शेवटी दोघे मित्र पायी निघाले. त्यांचे पाय जणुं हिंडण्यासाठीच जन्मलेले होते.

चार कोस एरंडोल होते. दोन तासांचा रस्ता होता. मध्येच जगन्नाथ पळू लागे. गुणाहि पळे.

“दमशील हो जगन्नाथ.”

“नाही रे. आतां मला जणुं पंख फुटत आहेत.” एरंडोल जवळ आले. म्युनिसिपालिटीचे दिवे लुकलुकत होते.

“गुणा, रात्री मी तुझ्याकडेच झोपेन.”

“नको. इंदिराताई जाग्या असतील. एक क्षण म्हणजे त्यांना युग वाटत आहे. त्यांच्या पायांवर तुझे मोटळे ठेवून मी घरी निघून जाईन.”

“जशी तुझी इच्छा.”

दोघे आता गावांत शिरले. एत कुत्रे भुंकत आले. परंतु ते ताबडतोब भुकायचे थांबले. जगन्नाथची छाती धडधडत होती.

“गुणा, मी पडेन, माझा हात धर, हात धर.”

गुणाने मित्राचा हात धरला. ती बोटे थरथरत होती. घाम सुटत होता. भावनांचा प्रचंड भोवरा हृदयांत फिरत होता.

जगन्नाथचे घर आले. चरख्याचे गुंगुं येत होते कानावर.

“जागी आहे इंदिरा.” जगन्नाथ म्हणाला.

“ती नेहमींच जागी असते.” गुणा बोलला.

दारावर त्यांनी थाप मारली.

“आई, आई!” गुणाने हांक मारली.

म्हातारी दिवा घेऊन आली.

“कोण रे?” तिने विचारले.

“आम्ही आलो. जगन्नाथ व मी.” गुणा म्हणाला. म्हातारीने दार उघडले. दिव्याच्या उजेडांत तिने मुलाला पाहिले. तिने दिवा खाली ठेवला. तिने त्याला पोटाशी धरिले. कौसल्येच्या वनवासानंतर राम भेटला. पंठरीशेटहि उठले. जगन्नाथ त्यांच्या पाया पडला. त्यांनी पाठीवरून, डोक्यावरून हात फिरविला.

“बाळ, आधी आता वर जा. ती सारखी रडत आहे. जा तिला भेट.”

दोघे मित्र वर गेले. जगन्नाथच्या खोलीत दोघी मैत्रिणी बसल्या होत्या.

« PreviousChapter ListNext »