Bookstruck

संध्या 11

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सलामी झाली. गडी भिडले. विजेचे पातें लवतें न लवतें तों कल्याणने गडी चीत केला. तो विजयी झाला. विजयी झालेल्या बालवीरांच्या पुन्हां कुस्त्या लावण्यांत आल्या. असे करीत करीत शेवटच्या जोडीतहि कल्याणच विजयी झाला. प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केलें.

बक्षिस-समारंभ. झाला. कल्याणला चांदीची ढाल मिळाली. त्याला इतरहि बरींच पदके मिळालीं. उडगी व सुपाणी गांवचे मित्र त्याच्याभोंवतीं उभे होते. गर्दी जाऊं लागली. कल्याण आपल्या गांवच्या मित्रांसह परत निघाला. इतक्यांत तेथे संध्या आली. तिच्या हातांत माळ होती.

“ही घ्या तुम्हांला माळ.” ती म्हणाली.

“मला ?” कल्याणने विचारलें.

“हो, विजयी वीराला. तुम्ही विजयी व्हाल असं मला आधींपासूनच वाटत होतं. तुम्हीं कुस्तींत नांव दिलं आहे असं मला कळलं, तेव्हांच मीं म्हटलं कीं कल्याण विजयी होईल. म्हणून माळ करून आणली होती.”

“तुम्ही मला ओळखता ?”

“हो, आमच्या गांवांत तुम्ही कवाईत शिकवायला येत असां, रस्त्यांतून एक-दोन करीत गाणीं गात जात असां. मी तुम्हांला पाहात असें. मला वाटे आपणहि जावं कवाईत करायला.”

“मग कां नाहीं आलात ?”

“लोक हसतील म्हणून !”

“भित्र्या आहांत तुम्ही. भित्र्याजवळची माळ मला नको.”

“तशी मी शूर आहे.”

“चल रे कल्याण, पोरीबरोबर काय बोलतोस ?” मुलें म्हणाली.

“पोरी म्हणजे, तुच्छ वाटतं, वाईट वाटतं ?” संध्येने विचारलें.

“परंतु लोक नांव ठेवतील.” कल्याण म्हणाला.

“तुम्हीहि लोकांना भितां एकूण ? कुस्ती करणारेहि भितात तर ?”

« PreviousChapter ListNext »