Bookstruck

संध्या 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“वेडे आहांत तुम्ही. अरे, मी पुण्याला जाईन, तर नवीन नवीन गोष्ट शिकेन. मला नवीन विचार मिळतील. इथं पहिलवान झालो. तिथं विद्वान् होईन. डोकं मिळवीन. तुमचा बालमित्र बुध्दिमान् व्हावा असं तुम्हांला नाहीं वाटत ? मग मी सुटींत आल्यावर तुम्हांला नवीन विचार देईन. मग आपण विचारांचं वनभोजन करूं. विचारांचं नवभोजन. जाऊं दे मला पुण्याला. तिथं मोठे मोठे लोक पाहीन. मोठे मोठे पुढारी पाहीन. जवाहरलाल पाहीन. माझ्या मनांत खूप खूप येत; तुम्हाला काय सांगू, किती सांगू ?”

“कल्याण, तू जा पुण्याला. तूं शीक. मोठा हो. तूं आमचा राम हो व आम्ही तुझे वानर. करूं मग लंकेची होळी, करूं रावणांना दूर.”

“कुठं आहेत रावण ?”

“अरे, जे जे छळतात ते सारे रावणच. गरिबांना खायला नसतांना जे बंगले बांधतात, ते रावण.”

“कल्याण, कुठं रे असं बोलायला शिकलास ?”

“माझ्या मनाजवळ. मी डोळे उघडे ठेवून वागतों. आजूबाजूचं जग पाहतों. आपल्या गांवांतील गरिबांची दशा तुम्हीं नाहीं का पाहिलीत ? बिचारे मर मर मरतात. परंतु त्यांना खायला नाही.”

“आणि कल्याण, मागं मोठा पाऊस पडला तेव्हां महारवाडयांतील झोंपडया पडल्या. त्यांना ना आधार ना आश्रय. कधीं रे ही अस्पृश्यता जाईल ?”

“आपण दवडूं तेव्हां. तुम्हां-आम्हांला धैर्य नाहीं. त्या दिवशीं अस्पृश्य मित्रांना मीं घरीं आणलं म्हणून बाबांनी मला मारलं; ज्या घरांत गरिबांचीं मुलं घेतां येत नाहीं, त्या घरांत राहूं नये असं मला वाटतं. खरं म्हणजे माझ्या आईसाठी मी सारं सहन करतो. तिला वाईट वाटू नये म्हणून मी जपतों; बाबा दुष्ट आहेत.”

“कल्याण, वडिलांना असं का बोलावं ?”

“वडील म्हणून मी त्यांचे पाय धरीन. पण गरिबांची बाजू जर ते घेणार नसतील, तर त्यांचा मी तिरस्कार करीन. नकोच इथं घरीं राहण कोंडमारा सारा; पुण्याला जाऊं दे.”

“पण पुण्याला तरी तुझे चुलते तुला मोकळेपणा देतील का ?”

“न देतील तर मी मोकळा होईन; स्वतंत्र होईन.”

“राहशील कुठं, जाशील कुठं ?”

“मोठया शहरांत मित्र मिळतील. कुठं काम करीन नि खाईन. “

“कोणत रे करशील काम ?”

“पडेल तें. “

“तुला कुस्तीशिवाय काय येत ?”

“मला कल्हई लावता येते; भांडीं घांसता येतात; धुणी धुतां येतात; पाणी भरतां येत.”

“तूं का कल्हई लावशील ?”

“हो.”

“असलं हलकं काम ?”

“कोणतंहि काम हलकं नाहीं. दुस-याला पिळून जगणं म्हणजे मात्र हलकटपणा. श्रमान जगणा-याला तुच्छ मानण म्हणजे हलकटपणा. श्रम करण हीच पवित्र वस्तु. प्रामाणिकपणाचा कोणताहि उद्योग तुच्छ नाहीं. भीक मागण्यापेक्षां, दुस-यांवर विसंबून राहण्यापेक्षां समाजाच्या उपयोगाचा कोणताहि धंदा श्रेष्ठ आहे.”

“कल्याण, तुला असं बोलायला कुणीं शिकवलं ?”

“तू अलीकडे खिडकींत एवढा बसत असस. त्या वेळीं वाटत हें ज्ञान तुला मिळालं ?”

“मला नाहीं रे माहीत.”

असे बोलत बोलत ते सारे मित्र आपल्या सुपाणी गांवी आले. कल्याण आपल्या घरी गेला. त्याचा लहान भाऊ रंगा तेथे धांवतच आला.

« PreviousChapter ListNext »