Bookstruck

संध्या 58

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“पत्र पाठव. प्रकृतीला जप. कांहीं लागलं सवरलं, तर कळव. कल्याण, संध्येला तूं जिंकलं आहेस. ती कधींच तुझी झाली आहे. तिनं तुला कधींच माळ घातली आहे. तुझं सुखदु:ख मला कळव. माझा त्यावर हक्क आहे हो.”

“जा आतां मागं ! “

“तुझ्या पाठोपाठ यावंसं वाटतं. विलक्षण ओढ, वेडी ओढ.”

“आज मनानंच पाठोपाठ ये.”

“तशी तर किती वर्षे येत आहें. शरीरानंहि कधीं येऊं ?”

“वेळ येईल तेव्हां.”

“कल्याण, आज माझा फोटो नाहीं का काढीत ?”

“तूं डोळे मीट म्हणजे काढतों.”

संध्या खरेंच डोळे मिटून उभी राहिली. कल्याणच्या डोळयांत पाणी आलें. तिनें डोळे उघडले तों कल्याण रडत होता.

“फोटो पाण्यानं धुऊन गेला ना ?”

“डोळयांतील या रसायनानं अमर झाला. जातों आतां.”

“थांब. तुला कांहीं तरी देतें.”

“काय देतेस ?”

कल्याणनें तो हातरुमाल घेतला. किती सुंदर होता तो !

“माझ्या त्या लहानपणच्या फोटोवरुन हा भरलास वाटतं ?”

“हो.”

“किती छान आहे ! परंतु मी तुला काय देऊं ?”

“तूं डोळयांतील पाणी दिलंस. तें पुरें. त्याहून थोर देणगी कोणती आणायची ?”

“जातों आतां.”

“पत्र पाठव.”

कल्याण गेला. संध्या थांबली. कल्याण पुन:पुन्हां मागें वळून पाहात होता. शेवटी एक वांकण आलें व तो दिसेनासा झाला. आकाशांत शतरंग उसळले होते. परंतु हें भव्य क्षणभर, फक्त क्षणभर. मागून अंधार, अनंत अंधार !

 

« PreviousChapter ListNext »