Bookstruck

संध्या 98

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कल्याण, आतां तूं जरा पड; मी बसतें.” ती म्हणाली. त्यानें ऐकलें. आतां गाडीत उकडत होतें. संध्येनें खिडकी उघडली. आकाशांत ढग जमले होते आणि थोडया वेळानें पाऊसहि आला. खिडकींतून शिंतोडे आंत येऊं लागले. कल्याणच्या तोंडावर ते उडत होते. तो जागा झाला नि उठून बसला.

“संध्ये, तुझ्या तोंडावर ऊन येत होतं म्हणून मीं खिडकीं लावली. परंतु माझ्या तोंडावर तुषार येत होते तरी तूं कांहीं लावली नाहींस.”

“त्या तुषारांनीं तुला हुषारी वाटेल, आनंद वाटेल, असं मला वाटलं.” ती म्हणाली.

थोडया वेळानें दोघांनीं फराळ केला. आतां पाऊस थांबला होता. आणि पुढें तर रखरखीत प्रदेश लागला. एके ठिकाणीं शेतांत मोट चालली होती. संध्या एकदम आनंदली.

“मोट-मोट, कल्याण, ती बघ मोट ! “ती म्हणाली.

“तुला मोट पाहून इतका आनंद झाला ?” त्यानें विचारलें.

“कल्याण, मी आजीबरोबर मळयांत जात असें. मी सुध्दां मोट हांकायची, परंतु जमत नसे. कधीं कधीं रिकाम्या मोटेबरोबर मी खालीं विहिरींत जात असें आणि मोटवाला मला पुन्हां वर ओढून घेई. कल्याण, मोट रिकामी होते तेव्हां कसं धो धो पाणी पडतं. तो आवाज माझ्या कानांत घुमत आहे. मजा ! “

“आतां मुंबईला मोटा नाहींत. तिथं पाण्याचे नळ.”

“त्यांची करंगळीसारखी धार.”

“संध्ये, तुला मुंबई आवडणार नाहीं.”

“पण तूं आहेस ना तिथं. जिथं तूं आहेस तिथं मी आनंदानं राहीन. कल्याण, आपण एखाद्या खेडेगांवांत राहिलों असतों तर किती छान झालं असतं ! आपण लहानसा मळा केला असता; गाय ठेवली असती; फुलझाडं लावलीं असतीं; वांग्यांचं भरीत करून भरीतभाकरी झाडाखालीं बसून खाल्ली असती. पांखरांची गोड किलबिल ऐकली असती मीं. झाडावर चढून कोकिळा बनून कुहू करून तुला साद घातली असती मीं. झाडावर चढून कोकिळा बनून कुहू करून तुला साद घातली असती; तूं वर पाहिलं असतंस व लहानसा खडा मारला असतास. परंतु आतां आपण मुंबईला राहणार. तिथं काय करतां       येईल ?”

“मुंबईला तुला काय करतां येईल ? तूं खरंच तिथं कंटाळशील. तिथं गिरण्यांचीं धुराडीं, ट्रामगाडयांचा खडखडाट, मोटारींचं पों पों, रस्त्यांतून गर्दी. आपली लहानशी खोली; तींतून दिसणारं लहानसं आकाश, संध्ये, तुझं कसं होईल ?”

“सारं चांगलं होईल. मी मुंबईला कंटाळलें, तरी तुला नाहीं कंटाळणार.”

पुणें आलें. संध्या नि कल्याण विश्वासच्या खोलीवर आलीं. विश्वास, बाळ सारे तेथें होते. विश्वासची प्रकृति जरा बरी दिसत होती.

“लग्नाचे लाडू आणलेत का ?” विश्वासनें विचारलें.

“तूं आजारी असशील म्हणून आणले नाहींत.”

“अरे, खायला मिळत नाहीं म्हणून तर आजही पडतों.”

“आणले आहेत हो विश्वास, लाडू ! “संध्या एकदम म्हणाली.

“बायकांना धीर नसतो !” कल्याण म्हणाला.

« PreviousChapter ListNext »