Bookstruck

संध्या 105

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१४

मुंबईचा त्याग

संध्या व कल्याण परळच्या बाजूस एका लहानशा खोलींत राहात होतीं. ती खोली लहान होती. परंतु त्या खोलींत आनंद-सिंधु होता. किती स्वच्छ होती खोली ! त्या खोलींत चारच भांडीं होतीं, परंतु तीं आरशासारखीं होतीं. त्या खोलींतील संध्याराणी म्हणजे प्रेमदेवता होती. प्रेमाचा नंदादीप तिनें तेथें पाजळला होता. कल्याण सकाळीं बाहेर पडे. तो युनियनच्या कचेरींत काम करी. दुपारीं बारा-एकच्या सुमाराला तो घरीं येई. दोघें बरोबर हंसत बोलत जेवण करीत. कल्याण मग पुन्हां बाहेर जाई. सायंकाळीं सभा, कोठें वर्ग वगैरे असत. तें सारें आटोपून तो आठाचे सुमारास घरीं परते. सायंकाळ झाली म्हणजे संध्या स्वयंपाकाला लागे. स्वयंपाक करून खोलीला कुलूप लावून ती खालीं रस्त्यावर येऊन उभी राही. हजारों लोक जात-येत असत. मोटारी, घोडयाच्या गाडया, सायकली, गर्दी असे. नाना वस्तु विकणा-यांच्या चालत्या ढकलगाडया दिसत असत. संध्येचें लक्ष कोठें असे ? तिचें लक्ष एका गोष्टीकडे असे. त्या सर्व संभारांत कोठें कल्याण येतांना दिसतो का तेवढेंच तिचे डोळे पाहात असत. त्यासाठीं तिची नजर चौफेर असे.

आणि कल्याणहि संध्येला बघत येई. संध्या कोठें तरी उभी असेल असें मनांत येऊन त्याचे डोळे शोधतच येत. उभयतांची शोधक दृष्टि एकदम दुरून भेटे व सुकलेलीं हृदयें फुलत. जणूं अमृतसिंचन होई. प्रिय व्यक्तीच्या स्मरणानेंहि आनंद होतो. मग दर्शनानें किती होईल ! हस्तस्पर्श होतांच किती होईल ! संध्या कल्याणचा हात हातीं घेई व दोघें खोलींत येत. जेवण, झुणका-भाकरीचें बहुधा जेवण असे. सुटसुटीत काम.

एके दिवशीं रात्रीं घरीं आल्यावर कल्याण म्हणाला,

“संध्ये, तुला त्रास होतो ना ?”

“मला रे कसला त्रास ? तूंच दमतोस. दिवसभर तुला कष्ट. माझा घरीं बसून वेळहि जात नाहीं. चटईवर पडून तुझं ध्यान करतें. दुसरं काय करूं ?” ती म्हणाली.

“म्हणूनच कंटाळा येतो ना ?”

“तुझी आठवण करून का कंटाळा येईल ?”

“संध्ये, आज आपण बोलपट पाहायला जाऊं. “

“कशाला उगीच ?”

“जाऊं. महिन्यांतून एकदांसुध्दा नये का जाऊं ? चल, लौकर जेवूं व जाऊं.”

संध्या नाहीं म्हणालीं नाहीं. कल्याणचा आनंद तो तिचा होता. जेवण उरकून दोघें निघालीं. ट्रॅममध्यें बसलीं. आणि एका बोलपटगृहाजवळ आलीं. तेथें तुफान गर्दी होती. खालचीं तिकिटें बंद झालीं होतीं. रुपयावरचीं तिकिटें मिळत होतीं.

“संध्ये, रुपयारुपयाचीं काढून तिकिटं ?”

“नको हो कल्याण. दोन रुपये आठवडाभर जेवायला पुरतील. बाहेरूनच आपण हीं चित्रं पाहूं, म्हणजे पुरे.”

“दोन दिवस उपाशी राहूं. इतकीं आलों नि आतां का तसंच परत जायचं ? मी काढतों तिकिटं.”

“मी येणार नाहीं. तूं एकटा जा. मी बाहेर उभी राहीन.”

« PreviousChapter ListNext »