Bookstruck

संध्या 107

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कल्याण, दुपारीं कुठं जेवतोस ?”

“संध्ये, तिकडे काम असतं. मग तिथंच हॉटेलांत घेतों राइसप्लेट.”

“तेवढयानं पोट भरतं ?”

“हो. एका राइसप्लेटींत तुझं-माझं दोघांचं पोट भरेल.”

संध्या विश्वास ठेवी. परंतु कल्याण उपाशीच असे. रात्री संध्येबरोबर तो थोडेंसें खाई. कल्याण अशक्त होऊं लागला. जिने
चढतांना तो दमून जाई. एके दिवशीं जिना चढून येतांना घेरी येऊन तो पडला. संध्या धांवली. इतरहि शेजारी आले. कल्याणला सावध करून खोलींत नेण्यांत आलें. संध्या त्याच्याजवळ बसली.

“आतां बरं वाटतं का, कल्याण ?”

“हो, बरं वाटतं.”

“कशानं रे घेरी आली ?”

“पित्त वाढलं आहे. अपचन, दुसरं काय ? काल जरा भजीं जास्त खाल्लीं होतीं. मित्राच्या आग्रहामुळं खाल्लीं.”

“कल्याण, घरींच जेवायला येत जा.”

“थोडया दिवसांनी पाहूं.”

कांहीं दिवस रेल्वे-कामगारांच्या युनियनमध्यें कल्याणला थोडें काम मिळालें. परंतु तेथें पक्ष होते. त्यामुळें तें काम पुन्हां गेलें.

उपासमार डोळयांसमोर दिसूं लागली. संध्येच्या लक्षात या गोष्टी येऊं लागल्या होत्या. परंतु ती अद्याप बोलली नव्हती. एके दिवशीं तिनें रात्रीं फक्त कल्याणचेंच पान वाढलें.

“माझंचसं एकटयानं पान ? तुला नाहीं जेवायचं ?”

“दुपारीं आज जास्त झालं जेवण. भूक नाहीं. “

“संध्ये, खोटं बोलत आहेस.”

“तूं माझ्याशीं खरंच बोलतोस ना ? कल्याण, लग्न लागून आपण परत येत होतों. बैलगाडींत होतों. सूर्य मावळत होता. त्या वेळेस तूं काय म्हटलंस तें आठवतं ?”

“माझ्या आठवणी मरत चालल्या. काय बरं मीं म्हटलं होतं ?”

“आपण एकमेकांपासून कधींहि कांहीं लपवायचं नाहीं असं नव्हतं ठरलं ?”

“हो.”

“मग तुझं दु:ख तूं माझ्यापासून कां बरं लपवतोस ? तें मला का कळत नाहीं ? माझे डोळे तुझा चेहरा का वाचीत नाहींत ? तुझ्या चेह-यावरून, बोलण्याचालण्यावरून, वागण्यावरून सारं माझ्या ध्यानांत येतं. स्त्रियांपासून तुम्ही कांहीं लपवू शकणार नाहीं. त्या क्षणांत सारं जाणतात. कल्याण, तूं दु:खी आहेस. तूं दुपारी जेवत नाहींस. मला खोटं सांगतोस. अपचनानं घेरी आली, कीं उपाशी राहिल्यानं आली ?”

“संध्ये, उपाशी नको राहूं तर काय करूं ? हल्लीं काम कमी झालं. पैसे कुठून आणायचे ?”

“परंतु तें मला कां नाहीं सांगितलंस ? तूं उपाशी राहात होतास व मी दोन्ही वेळां जेवत होतें.”

“तूं जेवलीस म्हणजे मलाच मिळे.”

« PreviousChapter ListNext »