Bookstruck

संध्या 111

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“कल्याण तुझ्यासाठीं जपतो ना ?”

“तें त्याला विचार. आतां जेवायला चला बरं. मला भूक लागली आहे. तुम्ही उपाशी राहतां. परंतु संध्येला नाहीं हो राहवत.”

जेवणें झाली. आणि कल्याण व विश्वास फिरायला निघाले.

“मी येऊं का, कल्याण ?”

“तुला न्यायचं असतं, तर मीं आधींच नसतं का चल म्हटलं ?”

“कुठं जातां तुम्ही ?”

“कांहीं महत्त्वाच्या कामाला.”

“जा हो; महत्त्वाचीं कामं आम्हां बायकांना काय करायचीं ?”

“संध्ये, लगेच असं ग काय म्हणतेस ? “

“नाहीं हो, पुन्हां असं बोलणार, कल्याण. प्रेमानं जरा भांडूंहि नये वाटतं ?”

“प्रेमानं रागावून म्हणत असशील तर कांहींच म्हणणं नाहीं.”

“तुझ्यावर खरं रागावतां मला येईल का तरी ? या जन्मीं तरी नाहीं हो तें शक्य.”

ते दोघे मित्र गेले. आणि संध्या खोलींत एकटीच होती. परंतु ती आज अस्वस्थ होती. अशान्त होती. आज तिला घरच्या सर्वांची आठवण आली. आई आठवली. बाबा आठवले. आणि प्रेमळ आजी आठवली. आजीची आठवण येतांच संध्या इकडे तिकडे पाहूं लागली. एकदम आजी जवळ आहे असा तिला भास झाला. ती घाबरली, परंतु लगेच शांत झाली. तिनें आपली ट्रंक उघडली. ट्रंकेंतील देवाची ती सुंदर मूर्ति तिनें काढली. तिनें ती मूर्ति मस्तकीं धरली. समोर एका सुंदर पुस्तकावर तिनें ती मूर्ति ठेवली. त्या मूर्तीसमोर ती डोळे मिटून बसली. ईश्वराच्या ध्यानांत ती रंगून गेली. आणि कल्याण व विश्वास आले. हळूच दार उघडून ते आंत आले. दाराला कडी नव्हती. संध्या प्रभुचिंतनांत बुडून गेली होती.

“संध्ये ! “विश्वासनें हांक मारली.

तिनें डोळे उघडले. कोणी बोललें नाहीं. संध्या बावरली, ओशाळली.

“आंत रे कसे आलेत ?” तिनें विचारलें.

“तुझ्या देवानं कडी काढली.” कल्याण म्हणाला.

“संध्ये, तूं कडी लावलीसच नव्हतीस. कोणी चोर येता तर ?”

“येता तर निराश होता. आहे काय घरांत न्यायला ?”

“संध्ये, तुझं माझ्यावर प्रेम नाहीं. “कल्याण म्हणाला.

“कशावरून ?”

“तुझं दुस-या कोणावर तरी प्रेम आहे.”

“काय हें कल्याण बोलतोस ?”

“खरं तें मी बोलतों.”

“कोणता रे पुरावा ?”

“प्रत्यक्ष डोळयांचा.”

“कल्याण ?”

“मी आजपर्यंत बोललों नाहीं. आज पाहिलं म्हणून बोलतों.”

“काय रे पाहिलंस ?”

“कीं दुस-यांचं तूं चिंतन करतेस. “

“म्हणजे त्या माझ्या मूर्तीचं ? होय ना ?”

« PreviousChapter ListNext »