Bookstruck

संध्या 127

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“बरं.” संध्या म्हणाली.

मालक निघून गेला.

“भाईजी, झडती वगैरे येईल कीं काय ?”

“परंतु झडतीसारखं घरांत तर कांहीं नाहीं.”

“पुन्हां या सर्वांना अटक तर नाहीं होणार ?”

“तसं सध्यां तरी वाटत नाहीं. तूं काळजी नको करूं.”

संध्या पुन्हां गुणगुणूं लागली. हल्लीं ती गाणीं गुणगुणे. मैना जरा सुखावली होती, मंदावली होती. ती खाटेवर वर्तमानपत्र वाचीत पडली होती. काय वाचीत होती ? ती वाचीत होती, कीं त्यांत कांही चित्रबित्र पाहात होती ?

“संध्ये, काय एवढं आहे त्या पत्रांत ?”

“कांहीं नाहीं.”

“पत्र डोळयांसमोर तर सारखं धरून बसली आहेस ! “

“एक चित्र पाहात होतें, भाईजी.”

“चित्र ?”

“हो.”

“कसलं आहे ? व्यंगचित्र ?”

“व्यंगचित्र नव्हे, दुसरं एक चित्र.”

“पाहूं दे, मला दाखव.”

“तुम्हीं हंसाल, मी नाहीं दाखवीत.”

“तूं नको दाखवूं, मी बघतों. आण बरं तो अंक.” संध्येनें स्मित करीत तो अंक भाईजींजवळ नेऊन दिला. ते पाहूं लागले, तों चित्र कोठचें दिसेना.

“संध्ये, कुठं आहे चित्र ?”

“डोळे असतील, तर दिसेल ! “

“अग, डोळे आहेत.”

“जरा निराळे डोळे हवेत. कल्पनेचे डोळे हवेत, आशेचे डोळे हवेत. भविष्य राज्याकडे पाहण्याचे डोळे हवेत.”

“तूं काव्यच बोलूं लागलीस ! “

“कधीं कधीं मला काव्य बोलतां येतं.”

“संध्ये, तुम्हां सर्वांचीं जीवनं म्हणजेच महाकाव्यं.”

“चित्र बघा ना पण आधीं.”

« PreviousChapter ListNext »