Bookstruck

संध्या 135

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“बघूं दे. सांग त्याला, कीं दिली होती विश्वासला; इतका भित्रेपणा काय कामाचा ?”
विश्वास हरिणीची सायकल घेऊन निघाला. हरिणी वरून पाहात होती व विश्वासनेंहि वर पाहिलें.

“नाहीं हो नेत, हरणे.” तो खालून म्हणाला.

“ने आतां विश्वास, ने हो.” ती वरून म्हणाली.

परंतु सायकल न घेतांच विश्वास निघाला. तो दरवाजापर्यंत गेला आणि पुन्हा परत आला. शेवटीं सायकल त्यानें घेतली व गेला एकदांचा.

हरिणी संध्येजवळ बसली होती. संध्या थकली होती. टांग्यांतून जरी ती गेली होती, तरी ती हालचाल तिला सहन झाली नाहीं.

“हरणे, माझं जरा अंग हळूहळू चेपतेंस ?” तिनें विचारलें.

“चेपतें हो, संध्ये.” हरिणी म्हणाली.

“परंतु संध्ये, आधीं इन्जेक्शन् घेतेस ना ?” कल्याणनें विचारलें.

“संध्याकाळीं घेईन.” ती म्हणाली.

“हरणे, सायंकाळी येशील ?” कल्याणनें विचारलें.

“येईन.” तिनें उत्तर दिलें.

संध्येचें अंग हरिणी हलक्या हातांनीं चेपीत होती. तोंडानें गाणें गुणगुणत होती. ती आनंदात होती.

“हरणे ! तुझ्या परीक्षेचा निकाल कधीं ? संध्येनें विचारलें.

“परवा ! “ती म्हणाली.

“तुला काळजी नाहीं ना पास होण्याची ?”

“संध्ये, मला आंतून निकाल कळला आहे.”

“पास झालीस ना ?”

“हो. परंतु वर्तमानपत्रांत येईल तेव्हां खरं. शाळेंत नांव लागेल तेव्हां खरं. संध्ये, तूं बोलूं नको हो कुणाजवळ.”

“पुरे हो, हरणे. जा आतां तूं घरीं. संध्याकाळीं ये इन्जेक्शन् द्यायला.”

हरिणी गेली. दुपारीं बाळ आपल्या आईला घेऊन आला होता. ती अनुभवी प्रेमळ वृध्द माता संध्येजवळ बसली. तिच्या
केसांवरून तिनें हात फिरविला.

“संध्ये, घाबरूं नकोस, सारं नीट होईल.” ती धीर देत म्हणाली.

“आई, हे भाईजी हो.” बाळनें ओळख करून दिली.

“तुमचं एक व्याख्यान मीं ऐकलं आहे.” बाळची आई म्हणाली.

“कधीं बरं ?” भाईजींनीं आश्चर्यानें विचारलें.

“गीतेवर होतं. मला आवडलं होतं. तुम्हांला स्वयंपाक चांगला येतो असं बाळ सांगत होता.” ती माता म्हणाली.

“लहानपणीं आईनं शिकवला होता. ती विद्या कामाला येत आहे.” भाईजी म्हणाले.

बाळ व त्याची आई निघून गेली.


« PreviousChapter ListNext »