Bookstruck

संध्या 153

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

१९

हरणीचें लग्न

दवाखान्यांत संध्येला ताप येऊं लागला. स्तनांतील दुधाचाहि त्रास होई. ती अधिकच अशक्त झाली.

“मला घरीं घेऊन जा, कल्याण.” संध्या म्हणाली.

“संध्ये, इथं जितकी तुझी काळजी घेतली जाईल. तितकी घरीं घेतां येईल का ? आणखी कांहीं दिवस तूं इथंच राहा. मग नेऊं
हो. धीर धर. उतावीळ नको होऊं.” कल्याण समजूत घालीत होता.

“इथं मनाला चैन नाहीं पडत.”

“कांहीं वाच. पुस्तक देऊं पाठवून ?”

“दे. श्यामची आई पुस्तक दे पाठवून.”

“पाठवीन.”

कल्याणनें तें पुस्तक संध्येला दिलें. संध्या तें वाची. तिनें पूर्वी तें कितीदां तरी वाचलें होतें. परंतु आतां पुन्हां वाचीत होती. तिला का आईची आठवण येत होती ? किती तरी दिवसांत आईचें पत्र आलें नव्हतें. तिनें तरी कोठें पाठविलें होतें ? आईकडे जावें, तिच्याजवळ बसावें, आईचा हात पाठीवरून, केंसांवरून फिरावा, असें का तिला वाटत होतें ? त्या पुस्तकांतूनच ती मातृप्रेमाचा चारा खात होती व तृप्त होत होती. तेवढेंच समाधान.

भाईजीहि आतां जाऊं म्हणत होते. संध्या घरीं आली तर स्वयंपाक वगैरे करणार कोण ? ती तर अशक्त व आजारी. यासाठीं विश्वासनें लौकर लग्न करावें असेंच सर्वांचें म्हणणें पडलें. म्हणजे मग हरणी राहायला येईल; आणि आर्थिक प्रश्नहि थोडा सुटेल. लग्न झाल्यावर तिला नोकरी मिळेल असें खात्रीपूर्वक वाटत होतें.

हरणीची आई या लग्नाला तयार नव्हती. हरणीवर तिच्या आईचें प्रेम होतें. तिनें आणखी शिकावें व एखाद्या श्रीमंताशीं लग्न लावावें असें तिच्या आईला वाटत होतें. मग काय करायचें ? सरकारी पध्दतीनें का लग्न लावायचें ? तें हरणीच्या आईला सहन होणार नाहीं. मग काय करायचें ?

एके दिवशीं विश्वास अकस्मात् आपल्या घरीं गेला. त्याची सावत्र आई जरा आजारी होती. तो आईजवळ बसला. तिला बरें वाटलें.

“आई, बाबांना एक विचारायला मी आलों आहें.”

“काय विचारणार आहेस ?”

“ते माझं लग्न लावायला तयार होतील का ? नुसता वैदिक विधि तेवढा करायचा.”

“कोणाबरोबर लग्न ?”

“हरणीबरोबर.”

“परंतु तिच्या आईची मान्यता आहे का ?”

“तशी मान्यता नाहीं. परंतु लग्न लागतांच आम्ही दोघं जाऊं व हरणीच्या आईच्या पायां पडूं. ती का आशीर्वाद देणार नाहीं ?”

“विचार त्यांना. ते तयार होतील.”

“कशावरून ?”

« PreviousChapter ListNext »