Bookstruck

संध्या 166

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अशीं निरनिराळीं बोलणीं चाललीं होतीं. दिवस जात होते. एके दिवशीं संध्येला घरीं आणण्यांत आलें. खाटेवर तिचें अंथरुण घालण्यांत आलें. त्याच्यावर ती पडून राहिली. जवळ कल्याण बसला होता. आज पोटभर तिच्याजवळ तो बसला. संध्येनें त्याच्या मांडीवर डोकें ठेवलें. ती शांतपणें पडून होती.

कल्याण व विश्वास यांचे पुढील बेत तिला कळले. तिला वाईट नाहीं वाटलें. तिच्या तोंडावर समाधान होतें. भाईजींजवळ बसून ती जेवली. हंसत बोलत जेवली. ती बरी होऊं लागली. तिच्या तोंडावर तेज येऊं लागलें. डोळेहि चमकदार दिसूं लागले.

“संध्ये, आईकडे ये ना जाऊन. बरं वाटेल. मनाच्या सा-या जखमा संपूर्णपणं भरून येतील. आम्ही किती केलं तरी आई ती आई. ये चार दिवस आईकडे जाऊन.” भाईजी म्हणाले.

“तुम्ही म्हणतां तसं मला एखादवेळेस वाटतं. परंतु जायला पैसे हवेत, भाईजी. कुठून आणायचे पैसे ? इथं सारं उधारीवर चाललं आहे. हीं माझीं कुडीं वीक म्हणून कल्याणला सांगणार आहें. दवाखान्यांतच त्याला म्हटलं होतं. परंतु त्याच्या डोळयांत पाणी आलं; परंतु जवळ ठेवून करायचीं काय ?”

“तूं घरी गेलीस व तुझ्या कानांत कुडीं नाहींत, हातांत बांगडया नाहींत, असं आईनं पाहिलं, तर तिला काय वाटेल ?”

“तिच्या मुलीचा तिला अभिमान वाटेल, कीं दागिन्यांत ही रमत नाहीं. माझी आई नाहीं हो रागावणार. आणि कल्याण वगैरे कसे आहेत तें आईला माहीतच आहे. हातीं सतीचं वाण घेतलेले हे फकीर आहेत, हें आई जाणून आहे.”

“संध्ये, तूं आतां बरी आहेस. मी आतां जाऊं ना ?”

“जा हो, भाईजी. प्रकृतीला जपा.”

“आमच्या प्रकृतीची काळजी आत्तां सरकार घेईल.”

“तुरुंगांत ना ?”

“हो; तिथं कसली ददात नाहीं. एकच दु:ख तिंथं असतं.”

“कोणतं ?”

“--कीं बाहेर राहून आपणांस काम करतां येत नाहीं. शेतकरी, कामकरी त्यांच्यांत प्रचार करतां येत नाहीं, त्यांची संघटना करतां येत नाहीं. बाकी सारं तिथं सुखच आहे.”

“भाईजी, पुन्हां केव्हां भेटाल ?”

“योग असेल तेव्हां. संध्ये, तुमचे माझे असे जिव्हाळयाचे संबंध येतील अशी कुणाला कल्पना तरी होती ? पुढच्या गोष्टी कुणाला माहीत ? एखादवेळेस खरंच मला वाटतं कीं आपण सारीं बाहुलीं आहोंत. ही विश्वशक्ति आपणांस नाचवीत असते. ज्या गोष्टींची आपणांस कल्पनाहि नसते, त्या गोष्टी आपणांकडून ती करवून घेते. भेटूं, पुन्हां भेटूं. आठवणींच्या रूपानं भेट नेहमींच आहे. तूं आनंदी राहा. पुन्हां खेळकर मैना हो.”

“जरा गंभीर मैना. आगींतून गेलेली मैना. दु:खाच्या खोल दरीचा ठाव घेऊन पुन्हां धीर करून उडूं पाहणारी मैना. होय ना ?”

“हो, किती छान बोलतेस तूं !”

“तुम्ही गेल्यावर असं मला कोण म्हणेल ? कोण करील असं कौतुक ? आजी म्हणायची हो “संध्ये, किती छान बोलतेस.” भाईजी, कांहीं म्हणा. माझ्या आजीचा आत्मा तुमच्यांत मिसळला आहे. त्यामुळं तुम्ही माझ्याकडे, आमच्याकडे खेंचले गेलांत. असेल का असं ?”

“कोणाला माहीत ?”

“एके दिवशी भाईजींनीं हरणीच्या हातांत रिस्टवॉच बांधलें; आणि म्हणाले, “हरणे ! वेळप्रसंग आला तर विकून टाक हो. संध्येचीं कुडीं गेलीं, बांगडया, तसं हें जाऊं दे. भाईजींनीं दिलेलं, कसं विकायचं, असं नका म्हणूं. मला आपलं वाटे कीं तुला कांहीं तरी द्यावं. तुम्ही अजून तरुण मुलं आहांत. कांहीं हौस असते, इच्छा असते. तुमचं सारं मन दडपलेलं असतं. परंतु यामुळं मनाला तितकी प्रसन्नता नाहीं वाटत. वाटतं कीं विचारावी एखादी तुझी हौस; करावी पूर्ण. तितकंच दडपलेलं मन जरा मोकळं होईल. आपल्या सुप्त व गुप्त मनांत अनंत चमत्कार चाललेले असतात. कुठं कशी कळ दाबली जाईल, एकदम कुठून कसे उत्साहझरे वाहूं लागतील, किंवा बंद होतील, त्याचा नेम नसतो.”

आणि एके दिवशीं भाईजी गेले. साश्रु नयनांनीं गेले; संध्येच्या केंसांवरून हात फिरवून, हरणीची पाठ थोपटून, कल्याणकडे सजल दृष्टीनें पाहात व विश्वासचा हात दाबून ते गेले. एक स्निग्ध, सौम्य, मधुर, मुकें असें संगीत जणूं तेथून गेलें !

« PreviousChapter ListNext »