Bookstruck

*कलिंगडाच्या साली 14

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

फांशी जायला दोन दिवस होते. शुक्रीनें अन्न वर्ज्य केले. ती एक घांस घेई व उठे. तिचेहि का प्राण जाणार ? मंगळ्या मस्त होता. तो गाणीं गुणगुणें

तुझी माझी खरी प्रीत
जगाला मी नाहीं भीत
फासाचा दोर मला फुSलांचा हार
लौकर ये वरतीं मला मिठि मार

शिपाई म्हणत, “मंगळ्या, मरण जवळ आलें लेका. देवाचे नांव घे.” “मी कशाला देवाचें नांव घेऊं ? मी का पाप केलें आहे? पाप करणार्‍यांनीं घ्यावें त्याचें नांव, मी शुक्रीचें नांव घेईन. आम्ही वर भेटूं. ती जेवत नाहीं. ऐकतों माझ्या हातची गोड थप्पड मिळाल्याशिवाय तिचें पोट भरत नाहीं. ती इथें कशी राहील?”

त्या दिवशीं उजाडतांच त्याला बाहेर काढण्यांत आलें. क्षणांत सारा खेळ खलास झाला आणि तिकडे औरत कोठ्यांत शुक्रीहि मरून पडली. ती अंथरुणावर त्या घोंगडीवर पडून होती. परंतु तिला उठवायला जातात तो काय? तेथें निश्चेष्ट देह पडलेला होता. प्राणहंस निघून गेला होता. दोन पांखरें प्रेमाच्या राज्यांत निघून गेलीं!

“धर्मा, आज तुझें तोंड उतरलेलें कां?”

“आज पोराची लई आठवण येते भाऊ. तुम्हीं आज सर्वांनी गोड करून खाल्लंत, मलाहि पोटभर दिलंत. परंतु पोटांत घांस जातांना डोळ्यांतून पाणी येत होतें. तुम्हीं स्वराज्य यावें म्हणून तुरुंगांत आलात. तुम्हांला तुरुंगांतहि किती सवलती, सोयी, आणि आम्हांला बाहेरहि पोटभर खायला नसतें. आम्हीं का अपराधी आहोंत, पापी आहोंत कीं आम्हांस पोटभर खायला नसावें, अंगाला कपडा नसावा? तुम्ही स्वराज्याचे कैदी. आणि मी चोर म्हणून कैदी. परंतु कशासाठीं केली चोरी? सर्वांना पोटभर खायला मिळावं म्हणून तुम्हीं तुरुंगांत आलांत. मी माझ्या मुलाबाळांना घांस मिळावा म्हणून तुरुंगांत आलों.”

“धर्मा, पालवणीचा ना तूं?”

« PreviousChapter ListNext »