Bookstruck

*कलिंगडाच्या साली 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“माझें मन म्हणत असतें ‘वेडी आशा करूं नये.’ तुम्ही इतके स्वराज्यवाले येथें आहांत तुरुंगांतसुद्धां घाणेरडें काम आमच्याच लोकांना. तुम्हीं केला आहे याचा विचार ? मागें तुमचे लोक दिवाण होते. तुरुंगातील भंगी काम आमच्याच नशिबीं असतें हें कां माहीत नव्हतें तुमच्या लोकांना ? तुरुंगाच्या वार्‍या तर मोप केल्यात. परंतु अजून महार भिल्ल अशांच्याच नशिबीं तुरुंगांत वंगाळ काम ? मोठें मन दादा नाहीं आढळत फारसें. सोन्यावाणी, माणकावाणी तें दुर्मिळ आहे.”

“धर्मा, तुझा मुलगा कधीं आला होता भेटायला ?” 

“कसा येणार भेटायला ? कोठले पैसे ? घरीं दोन घास खाऊं देत म्हणजे झालं.”

धर्माच्या डोळ्यांना पाणी आलें. तो पुन्हां म्हणाला :
“आज गोड खातांना त्यांचीच आठवण येत होती. हें थंडीचें दिवस. पोरांना पांघरायलाहि कांहीं नसेल. देव आहे सर्वांना.”

मी उठून गेलों. धर्माजवळ मी मधूनमधून जाऊन बसत असें. तो तुरुंगातलें काम करी. एका बाजूला भिंतींजवळ बसे. आम्ही स्वराज्यवाले. आमचे संडास साफ करण्याचें काम धर्मा करायचा. तें आम्हीच आमच्या अंगावर पाळीपाळीनें कां बरें घेतलें नाहीं ? तसा विचार तरी आमच्या मनांत आला का ? ४२ चा बाहेर चाललेला लढा हिंसक कीं अहिंसक याच्यावर आमच्या व्याख्यानमाला चालत. आमचे समाजवादाचे अभ्यासवर्ग असत. कोणी संगीत शिकत. कोणी संस्कृत. परंतु धर्माचा विचार कोणी केला होता का ? धर्मा व्यक्ती म्हणून नव्हे. परंतु ही जी गुलामगिरी देशभर आहे ती इंग्रज गेला तरी कशी जाणार ? भंग्याचे भंगीपण कधीं जाईल, अस्पृश्यांची अस्पृश्यता कधीं जाईल, निरनिराळे धंदे शिकून ते कधीं प्रतिष्ठित नागरिक होतील, याचा विचार आमच्या मनाला शिवत होता का ? प्रभु जाणे ! धर्माजवळ जाऊन बसलों म्हणजे तो म्हणायचा, “दादा, कशाला तुम्ही तेथें बसतां, तुम्हीं मोठे लोक.” मी त्याला म्हणायचा, “आपण सारे समान.” “शब्द आहेत दादा हे.” आणि माझें मनहि आंत खाई.

दिवस जात होते.

एके दिवशीं मी एकटाच फिरत होतों. थोडी पावसाची झिमझिम सुरू होती. आज कोठून आला पाऊस ? नुकसान करणारा पाऊस. आंब्याचा मोहर गळेल. गरीब लोक आंबे खाऊनहि राहतात. पुढें आंब्याच्या कोया खाऊन राहातात. कशाला हीं अभ्रें हा अकाली पाऊस, असें मनांत येत होतें. परंतु अनंत विश्वाच्या योजनेंत घडामोडी होतच असतात. आपणांस काय कळे त्यांचा अर्थ ? डोक्यांत विचार थैमान घालीत होते. मी भरभर चालत होतों.

« PreviousChapter ListNext »