Bookstruck

*कलिंगडाच्या साली 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सायंकाळची वेळ होती. महालक्ष्मी स्टेशनांत मी होतों. गाड्या भरून येत होत्या. जागा मिळेना घुसायला. दार धरून उभें राहायला मला धैर्य होत नव्हतें. जेव्हां मोकळी जागा मिळेल तेव्हांच गाडींत बसेन असें ठरवून मी एका बांकावर बसलों होतो. इतक्यांत पंधरासोळा वर्षांचा एक तरुण मुलगा माझ्याकडे आला. त्याच्या अंगावर चिंध्या होत्या. त्याची ती उंच देहयष्टी कृश दिसत होती. त्याच्या डोळ्यांत करुणा होती. त्याचे ते ओठ थरथरत होते. मी त्याच्याकडे बघत राहिलो. तो माझ्याकडे बघत होता. आम्ही एकमेकांच्या हृदयाला जणुं भेटू पहात होतों. तो माझ्या डोळ्यांत सहानुभूति शोधीत होता. मी त्याच्या डोळ्यांत प्रामाणिकता शोधीत होतो.

“दादा...” त्यानें शब्द उच्चारला.
“काय पाहिजे तुला ? का डोळ्यांत अश्रू ?”
“मी बेकार आहें. मुंबईत पोटाला मिळावें म्हणून मी आलों. चार दिवस झाले. मी उपाशी आहे. चार आणे द्या. थोडें खाईन.”
“तूं कुठला, कोण ?”
“मी दूरचा आहें. धामणी माझें गांव. घरी आईबाप आहेत. लहान भावंडे आहेत. परंतु खायला नाही. ना धंदा, ना मालकीची जमीन. नेहमीं मुंबईला जा’ पोटाला मिळव. उरलें तर घरीं आम्हांला पाठव. असें बाप म्हणायचा. अखेर गांव सोडलें नि मी येथें आलो. येथे ना ओळख ना देख. भटकत असतो.”
त्याला बोलवेना. मीं चार आणे काढून त्याला दिले.

“अहो, फसवतात हे लोक” शेजारी उभा असलेला एक गृहस्थ म्हणाला.

“फसवूं द्यात मोठेमोठे कारखानदार फसवीत आहेत. व्यापारी फसवीत आहेत. बडीं बडीं माणसें फसवीत आहेत. या मुलानें चार आण्यासाठीं फसवलें तर फसवलें.” मी म्हटलें.

“अहो, दान सत्पात्रीं करावें, शास्त्र सांगतें.” ते गृहस्थ धर्म सांगू लागले. त्या मुलाचे डोळे त्या गृहस्थाला उत्तर देत होते. मला खलिल जिब्रानचे शब्द आठवले. ईश्वरानें आयुष्याची थोर देणगी द्यायला ज्याला पात्र ठरविलें तो तुझ्या दोन दिडक्या घ्यायला पात्र नाहीं का ?  या जगांत ज्याचा उपयोग नसेल, त्याला ती विश्वशक्ति येथें राखील तरी कशाला ?

“तुमचे उपकार.” तो मुलगा म्हणाला.

« PreviousChapter ListNext »