Bookstruck

*कलिंगडाच्या साली 29

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पुढें मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल लागला. जयन्ता पास झाला. त्याला शेकडा ७० मार्क मिळाले. कोणत्याहि कॉलेजांत त्याला शिष्यवृत्ति मिळाली असती. त्यानें कॉलेजांत नांव घातलें. सकाळी कॉलेजांत जाणार होता, दुपारी नोकरी करणार होता. पंधरा वर्षांचा जयन्ता तासन् तास रेशनिंगचें काम करी. तो दमून जाई. शरिराची वाढ होण्याचें ते वय; परंतु त्याच वेळेस आबाळ होत होती. काय करायचें ?

जयन्ता घरी आईलाहि मदत करी. रविवारी घर सारवी. इतर भावंडांचे कपडे धुई, तो क्षणभरहि विश्रांति घेत नसे. घरांत विजेचा दिवा नव्हता, रॉकेल मिळायचे नाहीं. जयन्ता एका मित्राच्या घरीं अभ्यासाला जाई.

कॉलेज सुटल्यावर तो आता घरी येत नसे. तिकडेच राईस प्लेट खाऊन नोकरीवर जाई. परंतु जयन्ता अशक्त होत चालला.

“जयन्ता तुला बरं नाहीं वाटत ?” गंगूने विचारलें.
“बरें वाटतें तर ? तूंच जप. तुला इन्जक्शनें घ्यायला हवींत. त्यासाठी मी पैसे साठवून ठेवले आहेत. तू आमची एकुलती एर बहीण. मी देवाकडे गेलो तरी इतर भाऊ आहेत; परंतु तूं गेलीस तर दुसरी बहीण कुठें आहे ?”

“असें नको बोलूं, तूं शीक. हुषार आहेस. तूं मोठा होशील, खरेंच जयन्ता!”
“मला खूप शिकावें असें वाटतें.”
“शीक हो; परंतु प्रकृतीस जप.”

गंगू आता इंजेक्शने घेऊं लागली. जयन्ताचा शब्द तिला मोडवेना. परंतु जयन्ता मात्र खंगत चालला. “जयन्ता तुला काय होते ?” आईने विचारलें.

“परीक्षा जवळ आली आहे. रात्रीं अभ्यास करतो. म्हणून तुम्हाला मी असा दिसतो. शरीर थकले तरी मनाला खूप उत्साह आहे. परिक्षा संपली कीं तीन महिने मग अभ्यास नाही. प्रकृति सुधारेल. आई; काळजी नको करूं.”

“तो तिकडे तुरुंगांत; तुझी ही अशी दशा.”
“आई सार्‍या देशांतच अशी दशा आहे. त्यांतल्या त्यांत आपण सुखी नाहीं का ?”
“तूं शहाणा आहेस बाळ.”

आईच्या डोळ्यांत पाणी आलें. जयन्ता पुस्तक घेऊन निघून गेला. परीक्षा जवळ आली होती. गंगू, जयन्ता, दोघे त्या दिवशीं फिरायला गेलीं होतीं.

“गंगू, तुला आता बरें वाटतें ?”
“मला तुझी काळजी वाटते.”

« PreviousChapter ListNext »