Bookstruck

उदार आनंदराव 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

वामन वडिलांकडे बघत राहिला. पलंगावर मऊ गाद्यांवर  निजणारे आनंदराव, हजारोंना आधार देणारे आनंदराव, गरिबांचा दुवा घेणारे आनंदराव आज तेथे भणंग भिका-यांप्रमाणे अनाथप्रमाणे मरुन पडले होते. शेवटी का जगदंबेच्या पायाजवळ त्यांनी क्षमा मागितली? पुढचा जन्म चांगला दे’, असे का म्हटले? वामनचे डोळे भरुन आले.

‘बाबा, तुम्हीही गेलात?’ असा टाहो फोडून त्याने पित्याला मिठी मारली. परंतु त्याने अश्रू पुसले. त्याचे वेड गेले. जीवनातील नवीन दालन उघडले. तो जमलेल्या लोकांना, नर, नारींना, लहानथोरांना हात जोडून म्हणाला,

‘बंधू, भगिनींनो, माझे वेड गेले. माझी स्मृती आली. माझे हे  वडील आज येथे अनाथ दीनाप्रमाणे मरुन पडले आहेत. ज्यांनी हजारोंच्या अंगावर पूर्वी पांघरुन घातले,  ते आज उघडे राहून थंडीत मेले. आपला गाव सावध होवो. आपल्या गावातही दारुचा नवीन गुत्ता आला आहे. माझी तुम्हांला प्रार्थना आहे की गावचा गुत्ता दवडा. सुरगावात कधी दारु येऊ द्यायची नाही] असा संकल्प करा. सुरगाव म्हणजे सुरांचा गाव, देवांचा गाव. दारुचे विष येथे नको. प्रेमाचे अमृत येथे पिको. तुम्ही मला अशा प्रतिज्ञेची भीक घालीत असाल तर मी या गावात राहीन, मी जगेन. नाहीतर आईबाप गेले त्यांच्या पाठोपाठ मीही जातो. हे  आनंदराव, त्यांचे हे दु:खी मरण, दीनवाणे मरण तुम्हांला सांगत आहे, नीट जगायचे असेल तर दारुपासून दूर रहा' करा या मृतात्म्याला साक्ष ठेवून प्रतिज्ञा करा.'

सारे गंभीर होते. गावची प्रमुख पंच मंडळी म्हणाली,  आपल्या गावात दारु नको. सुरगावात कधीही दारु नको. ठरले. आनंदरावांचे उदाहरण जळजळीत निखा-याप्रमाणे सांगत आहे. केवढा मोठा पुरुष, त्यांची काय दशा झाली! या गावात दारू नाही येऊ द्यायची, ठरले ना?’ सारे हो म्हणाले.

आनंदरावांची प्रेतक्रिया झाली. वामन गावच्या त्या मरीमाईच्या देवळातच राहतो. तो दारुबंदीवर कीर्तने करतो. स्वत:च्या वडिलांची हकीगत सांगतो. कीर्तनात त्याचे डोळे भरून येतात. श्रोते सद्गदित होतात. आणि मग कीर्तनात तो विचारतो, ‘नाही ना गावात आणणार दारु? संकल्प करा. हात वर करा.’ आणि हजारो हात वर होतात.

तुम्ही सुरगावाला गेलात तर तेथे आनंदरावांची ही गोष्ट तुम्हांला ऐकू येईल. वामनही आता जिवंत नाही. त्या आठवणी आहेत. तो जुनाट पडका वाडा आहे. गावाबाहेर ते मंदिर आहे. गावाला पूर्वीची कळा नाही. परंतु काही असले तरी गावात दारू नाही आली. त्यामुळे सुरगावाला अजून मान आहे. आणि नवतरुणांनी सेवादल सैनिकांनी गावाचे पुन्हा गोकूळ करायचे ठरवले आहे. आनंदरावांच्या गोष्टीचा बोलपट करुन तेथील सेवादलाचे सैनिक गावोगाव दाखवणार आहेत. सुरगाव आदर्श करणार आहेत. त्यांना यश येवो.

« PreviousChapter ListNext »