Bookstruck

प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मृत्यू
स्वित्झर्लंडमध्ये आल्याच्या फरकाने कमलाला नि मलाही बरे वाटले.  ती अधिक आनंदी दिसू लागली; व स्वित्झर्लंडमधील या भागात मी पूर्वी फिरलो होतो म्हणून हा भाग माझ्या चांगलाच परिचयाचा असल्यामुळे मलाही घरच्यासारखे सरावातले वाटले.  कमलाच्या प्रकृतीत तशी म्हणण्यासारखी सुधारणा नव्हती,  परंतु तत्काळ धोकाही नव्हता.  पुष्कळ दिवस ज्या स्थितीत ती होती त्या स्थितीतच तिचे आणखी काही दिवस जातील असे वाटे.  हळूहळू कदाचित प्रगती झाली असती.

परंतु दरम्यान मनाला हिंदुस्थानची सारखी टोचणी सुरू होती.  परत या म्हणून मित्रांचा आग्रह सुरू झाला.  माझे मन अस्वस्थ, बेचैन झाले, व देशाखेरीज दुसरे काही सुचेना.  तुरुंगवासामुळे गेली काही वर्षे राष्ट्रीय प्रश्नांपासून माझी फारकत झाली होती; सार्वजनिक कारभारात प्रत्यक्ष भाग मला घेता आला नव्हता.  आणि मी बंधने तोडायला अधीर झालो होतो.  लंडनला, पॅरिसला मी दिलेल्या भेटी, हिंदुस्थानातून आलेली बातमी, या सर्व गोष्टींमुळे मी माझे कवच फोडून पुन्हा बाहेर आलो.  आता पुन्हा कवचात जाणे शक्य नव्हते.

याबद्दल कमलाशी मी चर्चा केली व डॉक्टरांचा सल्ला घेतला.  ते म्हणाले, जायला हरकत नाही.  तेव्हा डच विमानाचे हिंदुस्थानात जायचे तिकीट मी काढून ठेवले.  फेब्रुवारी २८ ला मी लॉसेन सोडणार होतो.  असे हे सारे ठरले खरे, परंतु शेवटी मला दिसून आले की, मी कमलाला सोडून जाणे तिला मुळीच पसंत नव्हते.  तो विचार तिला सहन होत नव्हता.  तरीसुध्दा बेत बदला, रद्द करा असेही ती मला सांगू इच्छित नव्हती.  मी तिला म्हटले, ''मी लौकर येईन.  हिंदुस्थानात फार वेळ थांबणार नाही.  जास्तीत जास्त दोन-तीन महिने.  तुला जरूर वाटली तर मी त्याच्याहूनही लौकर येईन.  तार येताच एका आठवड्याचे आत विमानाने मी तुझ्याजवळ येईन.''

ठरलेल्या तारखेला आता चारपाचच दिवस होते.  जवळ बेक्स गावी इंदिरा शिकत होती.  ते शेवटचे दिवस एकत्र राहण्यासाठी म्हणून ती येणार होती.  डॉक्टर माझ्याकडे आले व त्यांनी सुचविले की तुमची निघण्याची तारीख ८-१० दिवस पुढे लोटा.  अधिक काही ते सांगत ना.  मी बरे म्हटले आणि नंतरच्या विमानात जागा ठेवली.

असे हे शेवटचे दिवस एकामागून एक सरत होते आणि कमला हळूहळू पार बदलून चालली होती.  प्रकृती होती तशीच होती.  निदान आम्हाला तरी तीत काही फरक दिसला नाही.  पण असे वाटे की ही अंतर्मुख होते आहे.  भोवती काय चालले आहे इकडे लक्ष फार कमी.  ती मला म्हणे, ''कोणी तरी मला बोलावते आहे, ते पहा कोणीतरी खोलीत येत आहे.''  परंतु मला तर कोणी दिसत नसे.  तिला मात्र आकार दिसत, आकृती दिसत.

फेब्रुवारीची २८ तारीख.  त्या दिवशी उजाडत कमला गेली.  इंदिरा व गेले काही महिने आमचे भरवशाचे मित्र व नित्याचे सोबती बनलेले डॉ. एम. आताल त्या वेळी तिच्याजवळ होते.  स्वित्झर्लंडमधील जवळच्या गावाहून काही दुसरे स्नेही आले.  लॉसेनमधील स्मशानभूमीत तिला आम्ही नेले.  एका क्षणात त्या सुंदर शरीराची, त्या सदैव प्रसन्न हसर्‍या चेहर्‍याची चिमूटभर राख बनली.  इतके चैतन्य, इतका उत्साह, इतके तेज सारे निघून गेले व राहिलेल्या नश्वराचा अवशेष एका लहानशा कुंभात मावला.

मुसोलिनी
लॉसेनमध्ये नि युरोपात ज्या बंधनामुळे मी होतो ते बंधन तुटले.  तेथे अधिक राहण्याची जरुरी नव्हती.  माझ्यामधील आणखीही अंत:स्थ काहीतरी खरोखर तुटले, त्याची जाणीव मला हळूहळू झाली.  कारण ते दिवस मला दु:खाचे गेले.  जणू अंधारमय होते.  माझे मन नीट काम करु शकत नसे.  काही दिवस एकमेकांच्या सोबत घालविण्यासाठी इंदिरा व मी माँट्रो येथे गेलो.

माँट्रो येथे असताना लॉसेन येथे असणारा इटॅलियन कॉन्सल माझ्या भेटीला आला.  तो मुसोलिनीचा सहानुभूतीचा खास संदेश घेऊन आला होता.  मला जरा आश्चर्य वाटले.  कारण मुसोलिनीची नि माझी कधी भेटगाठही झाली नव्हती, किंवा त्याच्याशी दुसर्‍या कोणत्याही प्रकारचा माझा संबंध नव्हता.  मी कॉन्सलला म्हटले, 'मी फार आभारी आहे असे परत कळवा.'

« PreviousChapter ListNext »