Bookstruck

प्रकरण ३ : शोध 19

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

द्विविध जीवन

या अशा व अनेक प्रकारे मी हिंदुस्थानचे गतकालीन व वर्तमानकालीन यथार्थ स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न चालविला.  त्याकरता आज प्रत्यक्ष समोर वावरणार्‍या व पूर्वीच्या होऊन गेलेल्या व्यक्तींच्या विचारांचे, भावनांचे कल्लोळ नीट समजून घ्यावे म्हणून मी मनाने त्या त्या व्यक्तीशी तद्रूप होत होतो.  त्या व्यक्तींची अखंड रांगच्या रांग माझ्यापुढे होती व या रांगेत शेवटी शेवटी मीही धडपडत चाललो होतो व या रांगेशी, परंपरेशी एकरूप व्हावयाचा माझा प्रयत्न चालला होता.  मधूनच एखादेवेळी मी या रांगेतून निघून प्रेक्षक म्हणून डोंगरावरून दरीतले दृश्य पाहावे तसा पाहात होतो.

ह्या लांबच्या प्रवासाचा हेतू काय ?  ही कधीही न थांबणारी रांग थांबणार कोठे ?  हे विचार मनात सारखे येऊन मला थकवा येई व निराश होऊन हा खटाटोप व्यर्थ वाटे.  अशा वेळी या वृत्तीतून सुटण्याकरिता मी एक प्रकारची त्रयस्थ वृत्ती अंगी बाणण्याचा प्रयत्न करी.  हळूहळू माझ्या मनाला हे वळण लागून मन घट्ट झाले, व व्यक्तिश: मला किंवा माझे काय होणार या विचाराला मी अगदी काडीचीसुध्दा किंमत देईनासा झालो.  निदान असे मला तरी वाटू लागले, व काही अंशी खरेच असे वाटू लागले की हे आपल्याला साधले !  पण ते काही फारसे खरे नाही, कारण माझा स्वभाव ज्वालामुखीसारखा आतल्याआत इतका खळबळ करतो की, ही खरोखरी त्रयस्थवृत्ती काही जमत नाही व एकदम एखादेवेळी ही सर्व बंधने तटातट तुटून लांब उडून पडतात व माझी अनासक्तवृत्ती पार कुठल्याकुठे नाहीशी होते.

परंतु जे काही थोडे यश अशी वृत्ती मिळविण्यात मला आले होते त्याचाही फार उपयोग होई; आणि कर्माच्या भोवर्‍यात पडलो असताही त्या कार्मापासून स्वत:ला अलग करून त्रयस्थवृत्तीने मी बघू शकत असे.  कधीकधी माझे रोजचे सारे उद्योग, सारी चिंता विसरून घटका दोन घटका मी मनाच्या त्या अंतर्गाभार्‍यात जाऊन बसत असे आणि थोडा वेळ का होईना एक निराळेच जीवन अनुभवीत असे.  अशा रीतीने माझे हे जीवनाचे दोन भाग एकमेकांत पक्के गुंतलेले पण खरोखर वेगवेगळे राहून जीवनमार्ग कंठीत होते.

« PreviousChapter ListNext »