Bookstruck

प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 4

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सिंधूच्या खोर्‍यातील ही संस्कृती आणि आजचा हिंदुस्थान यांच्या मधल्या काळात कितीतरी अशी अज्ञात शतके, कितीतरी असे कालखंड होऊन गेले आहेत की ज्यांची आपणास काही माहिती नाही.  एका कालखंडाला दुसर्‍या कालखंडाशी जोडणारे दुवे नेहमीच नीट सापडतात असे नाही.  कितीतरी घडामोडी झाल्या असतील, कितीतरी बदल झाले असतील.  या सर्वांचे दुवे नीट सापडले नसले तरी या सर्व घटनांतून एकच एक, तीच ती परंपरा आढळते व आजचा हिंदुस्थान व सहासात हजार वर्षांपूर्वी उगम पावलेली ही सिंधु- संस्कृती यांना जोडणारी अखंड साखळी लक्षात येते.  मोहेंजो-दारो आणि हराप्पा येथील उत्खननावरून कितीतरी गोष्टी शेकडो वर्षे गेली तरी कशा टिकून राहिल्या आहेत हे दिसते.  काही विशिष्ट परंपरा, काही चालीरीती, कारागिरीचे काही प्रकार, काही धर्मकर्मे, पोषाखातीलसुध्दा काही चाली या आजही आढळतात.  येथल्या संस्कृतीचा पश्चिम आशियावर फारच परिणाम झाला.

ह्या सर्व माहितीवरून असे लक्षात येते की, हिंदुस्थानच्या इतिहासाच्या त्या उष: कालातसुध्दा हिंदुस्थानचे रूप कोवळ्या अर्भकाचे आढळत नाही, उलट कितीतरी गोष्टींत हा राष्ट्रपुरुष वयात आलेला दिसतो.  तो संसारविन्मुख होऊन जडसृष्टीच्या पलीकडच्या अस्पष्ट व अगम्य अशा गूढ तत्त्वांच्या स्वप्नसृष्टीत गुरफटलेला नसून उलट संसारातल्या कला व सुखसाधने या कामात त्याची बरीच प्रगती झालेली आढळते.  त्याने केलेली निर्मिती नुसत्या सुंदर वस्तूंचीच नव्हती तर उपयुक्ततेकडेही त्याचे लक्ष होते.  हल्लीच्या आधुनिक सुधारणेची ठळक चिन्हे— उत्तम स्नानगृहे व सांडपाण्याचा निकाल करण्याची योजनाही त्याने निर्माण केलेली आढळतात.

« PreviousChapter ListNext »