Bookstruck

प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

परंतु चिंतनशील वृत्ती हळूहळू आलीच; आणि पुढे तर एक ॠषी तळमळून म्हणतो, ''हे श्रध्दे, आम्हांला श्रध्दा दे.'' आणि एका सूक्तात तर अधिकच गहनगंभीर प्रश्न तो उभे करतो.  त्या सूक्ताला ''आरंभगान'' असे म्हणण्यात येते.  मॅक्समुल्लरने त्याला ''अज्ञात ईश्वराला'' अशी संज्ञा दिली आहे.  नासदीय सूक्त या नावाने ते अत्यंत प्रसिध्द आहे.  हा पाहा त्याचा अर्थ.

१.    त्या वेळेस सत् नव्हते, असतही  नव्हते.  वायू नव्हता, पलीकडे आकाशही नव्हते, कोणावर हे आच्छादन, कोण, कोठे आच्छादले गेले ? त्याला आधार कोणी दिला ? पाणी तरी होते का अगाध, अथांग पाणी ?

२.    तेथे मृत्यू नव्हता, अमर असेही काही नव्हते, तेथे दिवस-रात्र विभागणारी कसली खूणच नव्हती.  एकच वस्तू होती.  प्राण नसतानासुध्दा ती वस्तू स्वयं प्राणमय झाली.  त्या वस्तूखेरीज काहीही नव्हते.

३.    अंधार तेथे होता.  हे सारे अंधाराने व्यापलेले होते; अव्याकृत अशी प्रकृती तेथे होती, अस्पष्ट आणि गूढ असे जे काही होते ते सारे निराकार होते, शून्यवत होते; आणि तपाच्या तेजाने, उष्णतेच्या शक्तीने ते पहिले एक जन्मले.

४.    त्या पहिल्या आरंभातून प्रथम काम उत्पन्न झाला.  काम म्हणजे सार्‍या आत्म्याचे मूळ कारण, मूळ बीज असा ॠषींनी विचार केला; हृदयातील जिज्ञासेने त्यांनी शोधून काढले की जे आहे त्याचा जे नाही त्याच्याशी संबंध आहे.

५.    याच्या उलट विभाग रेषाही वाढली.  त्या वेळेस याच्या डोक्यावर काय होते, त्याच्या खाली काय होते ?  उत्पत्ती करणारे होते, शक्तीही होत्या; स्वच्छंद कर्म इकडे, अनंत शक्ती तिकडे.

६.    कसे कोठून हे सारे जन्मले, कोठून आली ही सारी सृष्टी ?  कोणाला खरोखर हे सारे माहीत आहे आणि कोण याचा पुकारा करू शकेल ?

सृष्टीनंतर हे देव जन्मले, म्हणून प्रथम ती सृष्टी कशी जन्मली हे कोण सांगेल, कोण घोषणा करील ?

७.    तो या सृष्टीचा आरंभ होता, त्याने हे सारे निर्माण केले असेल किंवा नसेलही.

परमोच्च स्वर्गात बसून जो आपल्या डोळ्यांनी या जगाचे शासन करतो, नियमन करतो त्यालाच खरोखर हे ठाऊक असेल किंवा त्यालाही ठाऊक नसेल.

« PreviousChapter ListNext »