Bookstruck

प्रकरण ५ : युगायुगांतून 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

''तो सुखी, जो दर्यावरील कंटाळवाण्या मुशाफरीतून सहीसलामत सुटला, तो वादळातून निसटला आणि बंदरात सुखरूपपणे येऊन पोचला.  तो सुखी, जो सर्व यातायातींतून मुक्त झाला.  जीवनाची कला मोठी चमत्कारिक आहे, ललाटरेषा मोठ्या विचित्र कोरलेल्या असतात.  एखादा क्वचित कोणी लक्षाधीश होतो, सत्ताधीश होतो आणि बाकीचे कोट्यवधी मानवी जीव कसेतरी धडपडत असतात.  मनात अनंतर आशा-आकांक्षा असतात.  त्यांच्या गजबजाटात, त्यांच्या जोरावर प्रवाहाशी झुंज घेता घेता ते वहात जातात, कसेतरी तग धरतात.  या कोट्यवधी जीवांचे काय होते ?  त्यांच्या इच्छा सफल होतात, नाहीतर विफल होतात.  आशा मातीत मिळतात किंवा त्या डोळ्यासमोर राहून त्यांच्यासाठी जीव झुरत राहतो.  परंतु हे आयुष्य चालले असता जीवन जगणे म्हणजेच खरोखरच सुखी असणे हे ज्याला समजू शकले त्यालाच त्याचा खरा स्वर्ग सापडला.''

''मनुष्य दु:खाच्या आगीतून जाऊन शिकतो; जीवनाला तोंड कसे द्यावे हे तो शिकतो.  परंतु अंतिम गूढ सदैव अज्ञातच असते हेही तो शिकतो.  या जगात मंगल व अरिष्ट का आहेत ते गूढ त्याला उकलता येत नाही, त्याच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत.

''विश्वाच्या रहस्यांची नाना रूपे आहेत.  ईश्वर अशा काही अनंत घटना घडवितो की, ज्या आशेच्या अतीत आहेत.  भीतीच्या पलीकडे आहेत.  मनुष्य अपेक्षा करीत असतो तसे घडत नाही व कल्पना नसते तेथे अचानक मार्ग निघतो.'' *

ग्रीक शोकान्त नाटकातील भव्यता व प्रभाव यांच्याशी तुलना करता येईल असे संस्कृत नाटकात काही नाही.  खरे म्हणजे संस्कृतात शोकान्त नाटकच नाही, कारण शोकान्त नाटकांना अनुज्ञा नव्हती.  नाट्यशास्त्राचा तसा नियम होता.  सुखदु:खाच्या मूलभूत प्रश्नांची त्यात चर्चाच नाही, कारण सर्वसामान्य जनता जी धार्मिक श्रध्दा घेऊन वागत होती, त्याच श्रध्देचा नाटककारांनीही अवलंब केलेला असे.  कर्मविपाक, पुनर्जन्म इत्यादी कल्पनेवर जनतेचा विश्वास होता, नाटककारांचाही होता. जगात आकस्मिक असे काही नाही.  दु:खही आगंतुक येत नाही.  त्याला काहीतरी कारण असते.  आज जे होत आहे, ते पूर्वजन्मीच्या कर्माचा अपरिहार्य असा परिणाम आहे.  मनुष्याला ज्याच्याशी सदैवच व्यर्थ झगडा करणे प्राप्त आहे, अशा अंधशक्तीच नाहीत. विश्वात आंधळ्या शक्ती असा धुडगूस घालीत नाहीत येवढ्या साध्या खुलाशाने भारतीय तत्त्वज्ञान्यांचे, विचारवंतांचे समाधान होत नव्हते.  त्यांना अधिक प्रकाश पाहिजे होता.  अधिक खोल जाऊन मूळ कारणे शोधून काढण्याची त्यांची सारखी धडपड होती.  आंधळ्या शक्ती किंवा पूर्वकर्मांचा परिणाम असा सुटसुटीत समारोप त्यांना पसंत नव्हता.  परंतु भारतीय जीवन पूर्वजन्म वगैरेच्या श्रध्देने भरलेले होते आणि नाटककार तसेच धरून चालले.  संस्कृत काव्य किंवा नाटक जीवनविषयक भारतीय तत्त्वज्ञानाला धरून होती, त्याच्याविरुध्द त्यांनी बंड केलेले फारसे आढळत नाही.  नाट्यशास्त्राचे निर्बंध असत, नियम असत.  त्यांचा भंग करणे सोपे नसे.  परंतु नायक दैवाला मुकाट्याने शरण गेला आहे असे दिसत नाही.  नायक हा धीरोदात्त असतो, संकटांशी झगडणारा वीरपुरुष असतो.  मुद्राराक्षस नाटकात आर्य चाणक्य म्हणतो, ''मूर्ख लोक दैवावर विसंबतात, स्वत:वर विसंबण्याऐवजी ते ग्रहनक्षत्रांवर विसंबून राहतात.'' नाटकात काहीतरी मध्येच कृत्रिम ओढूनताणून आणलेले प्रसंग येतात.
----------------------
*  वरील दोन उतारे गिल्बर्ट मरे यांच्या युरिपिडसच्या नाटकांच्या भाषांतरातील आहेत.  पहिला उतारा 'बॅकेई' या नाटकातील आणि दुसरा 'अलसेस्टिस' मधील आहे.

« PreviousChapter ListNext »