Bookstruck

प्रकरण ५ : युगायुगांतून 47

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

पंतजलीचे योगदर्शन म्हणजे मुख्यत: शरीर व मनाचे पध्दतशीर नियंत्रण करून शेवटी अतींद्रिय व आध्यात्मिक शिक्षण देण्याचा मार्ग आहे.  पतंजलीने योगशास्त्रालाच नीट स्वरूप दिले असे नाही तर पाणिनीच्या व्याकरणावरही त्याने एक प्रख्यात विवेचनात्मक महाभाष्य लिहिले आहे.  पाणिनीच्या व्याकरणाइतकीच महाभाष्याचीही थोरवी मानण्यात येते.  दोन्ही अपूर्व आहेत.  लेनिनग्राड येथील प्रोफेसर स्ट्चरबात्स्की म्हणतो, ''पतंजलीच्या महाभाष्यासहित पाणिनीचे व्याकरण म्हणजे हिंदुस्थानातील आदर्श शास्त्रीय ग्रंथ होय.'' *

योग हा शब्द आता युरोप-अमेरिकेत माहीत झाला आहे.  परंतु त्याचा अर्थ मात्र फारसा कोणाला कळत नाही.  काही चमत्मारिक आसने, विचित्र आचार, बुध्दासारखे ध्यानस्थ बसणे, नाभीकडे किंवा नासिकाग्राकडे दृष्टी लावणे इत्यादी प्रकार म्हणजे योग अशी त्यांची समजूत असते.  शारीरिक कसरतीचे काही दोन-चार विचित्र आसनप्रकार शिकून घेऊन तेवढ्या भांडवलावर काही लोक पाश्चिमात्य देशात या शास्त्राचे अधिकारी म्हणवून घेण्याचे धाडस करतात व भोळ्याभाबड्या किंवा चमत्काराच्या मागे लागलेल्या चारचौघांवर छाप पाडुन त्यांना लुबाडतात.  परंतु योग म्हणजे केवळ शरीराची मांडणी मोडणी नव्हे.  काही मानसशास्त्रीय कल्पनांवर योगशास्त्राची उभारणी आहे.  या विश्वाची किंवा शाश्वत सत्य तत्त्व म्हणजे कोणते, काय ह्याची अगोदरच काहीएक कल्पना ठरवून काढलेला एक सिध्दान्त म्हणून योगशास्त्राची योजना नसून ज्याने त्याने स्वत: या विषयाचा शोध

-------------

*  १.  योग सुत्रांचा कर्ता पतंजली आणि महाभाष्यकार व्याकरणकार पतंजली हे एकच असे अद्याप निर्विवाद सिध्द झाले नाही.  व्याकरणकार पतंजलीचा नक्की काळ ख्रिस्तपूर्व दुसरे शतक होय.  योगसूत्रकार पतंजली हा निराळा होता आणि व्याकरणकारानंतर दोन-तीनशे शतकांनी तो झाला असे काहींचे मत आहे.

२. 'योग' या शब्दांचा अर्थ जोडणे असा आहे.  इंग्रजीतील 'योक' म्हणजे जोडणे हा शब्द आणि संस्कृत 'योग' शब्द एकाच धातूपासून बनले असावेत असे वाटते.

करण्याकरता, स्वत:चे स्वत: शोधून काढण्याचा मार्ग शिकवणे एवढाच त्या शास्त्राचा हेतू आहे.  योगशास्त्र हे प्रयोगाचे शास्त्र आहे, हे प्रयोग करण्यासाठी कशा प्रकारची अनुकूल परिस्थिती असावी याचे त्यात नीट दिग्दर्शन केलेले आहे.  म्हणून षड्दर्शनांपैकी कोणतेही दुसरे एखादे दर्शन मानणार्‍यांनासुध्दा ही योग्यपध्दती स्वीकारायला हरकत नाही, कारण त्या त्या शास्त्राचे सिध्दान्त जरी विभिन्न असले तरी मनाची एक विशिष्ट स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी योगाचा कोणीही अवलंब केला तरी चालण्यासारखे आहे.  निरीश्वरवादी सांख्यही यौगिक पध्दतीचा अवलंब करीत.  बौध्दधर्मीयांनीही स्वत:चे योगशास्त्र बनविले होते.  पतंजलीच्या योगशास्त्रात व त्याच्यात काही साम्य आहे, तर काही विभिन्नताही आहे.  पतंजलीच्या योगशास्त्रातला सिध्दान्ताचा भाग त्या मानाने कमी महत्त्वाचा आहे; त्यातील पध्दती महत्त्वाची आहे. परमेश्वरावरील श्रध्दा ही गोष्टही या शास्त्रात आवश्यक मानलेली नाही, परंतु अशा सगुण ईश्वरावरील श्रध्देमुळे व त्याची भक्ती केल्यामुळे मनाची एकाग्रता व्हायला सोपे जाते म्हणून वाटले तरी ती श्रध्दा ठेवावी अशी उपयुक्ततेच्या दृष्टीने सूचना केली आहे.

« PreviousChapter ListNext »