Bookstruck

प्रकरण ६ : नवीन समस्या 59

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्वातंत्र्याच्या इतिहासात अमेरिकन स्वातंत्र्याची घोषणा म्हणजे एक प्रगतीचा टप्पा आहे.  १७७६ मध्ये ही घोषणा केली गेली, आणि नंतर सहा वर्षांनी या वसाहती इंग्लंडपासून स्वतंत्र झाल्या.  त्यांनी मग आपले खरे बौध्दिक, आर्थिक, सामाजिक क्रांतिकार्य सुरू केले.  ब्रिटिशांच्या प्रेरणेने जी जमीनपध्दती अस्तित्वात आली होती, जी इंग्लंडमधील नमुन्याबरहुकूम होती, तिच्यात आमूलाग्र बदल करण्यात आला.  कितीतरी मिरासदारी व वतनदारीचे हक्क नष्ट करण्यात आले; मोठमोठ्या इस्टेटी जप्त करण्यात आल्या आणि त्या वाटून देण्यात आल्या.  एक नवीन जागृती येऊन अननुभूत नवचैतन्य संचारून बौध्दिक आणि आर्थिक चळवळीही मागोमाग आल्या.  सरंजामशाहीच्या अवशेषांपासून आणि परकी सत्तेपासून मुक्त झालेली अमेरिका प्रचंड पावले टाकीत झपाट्याने पुढे निघाली.

फ्रान्समध्येही क्रान्ती होऊन जुन्या व्यवस्थेचे प्रतीक असणारा बॅस्टिलचा तुरुंग शतखंड झाला व राजेरजवाडे, सारी सरंजामशाही निकालात निघून मानवी हक्कांची घोषणा जगासमोर केली गेली.

आणि इंग्लंडात काय होते ?  अमेरिका आणि फ्रान्स या देशांतील क्रांतिकारक घडामोडींनी घाबरून जाऊन इंग्लंड अधिकच प्रतिगामी झाले व रानटी आणि भेसूर फौजदारी कायदे अधिकच रानटी करण्यात आले.  १७६० मध्ये तिसरा जॉर्ज जेव्हा गादीवर आला तेव्हा १६० गुन्हे असे होते की, त्यांच्यासाठी स्त्री-पुरुष, मुलेबाळे सर्वांना देहान्तशिक्षा असे.  तिसर्‍या जॉर्जची दीर्घ कारकीर्द १८२० मध्ये संपायच्या वेळेस या १६० गुन्ह्यांच्या यादीत आणखी शंभर गुन्हे घालण्यात आले होते.  ब्रिटिश सैन्यातील सामान्य सैनिकाला पशूहूनही पशू समजून वागविण्यात येई, ते इतके क्रूरपणे की, अंगावर शहारे येतात.  देहान्तशिक्षा म्हणजे रोजचा प्रकार आणि फटके मारणे तर विचारूच नका.  फटके सार्वजनिक जागी देण्यात येत.  कधी कधी शेकडो फटक्यांची सजा असे; फटके खाता खाताच अपराधी कधी मरून जाई किंवा त्या यमयातनांतून तो दुर्दैवी जीव वाचलाच तर त्याचे ते शीर्णविदीर्ण शरीर ती अमानुष कथा मरेपर्यंत सांगत राही.

या बाबतीत, त्याचप्रमाणे माणुसकी, व्यक्तीची व समूहाची प्रतिष्ठा ज्यात ज्यात म्हणून असे त्या सर्वच बाबतीत हिंदुस्थान कितीतरी पुढे गेलेला होता, सुधारलेला होता.  त्या काळात इंग्लंडमध्ये किंवा युरोपमध्ये जेवढी साक्षरता होती, त्याहून अधिक साक्षरता या देशात होती.  अर्थात येथले शिक्षण परंपरागत असे असे.  इंग्लंड किंवा युरोपातल्यापेक्षा अधिक सुखसोयीही येथे होत्या व अधिक चांगल्या नागरिक चालीरीती होत्या.  युरोपातील बहुजनसमाजाची सर्वसाधारण स्थिती फार मागासलेली आणि दीनवाणी अशीच होती.  तिच्याशी तुलना करता हिंदुस्थान कितीतरी सुखी व सर्वसाधारणपणे पुढारलेला होता.  परंतु एक महत्त्वाचा प्राणभूत असा फरक होता. पश्चिम युरोपात नवीन शक्ती, नवीन जिवंत प्रवाह यांचा न कळत का होईना उदय होत होता, आणि त्याच्याबरोबर नवीन फेरबदलही येत होते.  परंतु हिंदुस्थानातील परिस्थिती साचीव व गतिहीन अशी झाली होती.

« PreviousChapter ListNext »