Bookstruck

प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 7

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

बंगालच्या लुटीमुळे इंग्लंडातील औद्योगिक क्रांतीला झालेली मदत

सतराव्या शतकाच्या आरंभीच ईस्ट इंडिया कंपनीने मोगल सम्राटापासून सुरतेला वखार घालण्याची परवानगी मिळविली होती.  काही वर्षांनी दक्षिणेकडे लहानसा तुकडा विकत घेऊन त्यांनी मद्रास बांधिले.  १६६२ मध्ये पोर्तुगालच्या राजाने आंदण म्हणून दुसर्‍या चार्ल्सला मुंबई बेट दिले आणि राजाने कंपनीला ते बहाल केले.  १६९० मध्ये कलकत्त्याचा पाया घातला गेला.  अशा रीतीने सतराव्या शतकाच्या अखेरीस हिंदुस्थानात पाय रोवायला अनेक ठिकाणे ब्रिटिशांनी मिळविली होती व हिंदी किनार्‍यावर उतरायला ठाणी मिळवून ठेवली होती.  मग हळूहळू ते अंतर्भागात शिरले.  १७५७ मधील प्लासीच्या लढाईने प्रथम बराचसा मुलूख त्यांच्या ताब्यात आला, आणि थोड्याच वर्षांच्या अवधीत बंगाल, बिहार, ओरिसा आणि पूर्व किनारा त्यांनी ताब्यात घेतला.  दुसरी मोठी उडी पुढे ४० वर्षांनी, एकोणिसाव्या शतकाच्या आरंभाला त्यांनी घेतली.  या उडीने ते दिल्लीच्या दरवाज्यात आले.  तिसरा टप्पा १८१८ मध्ये मराठ्यांचा शेवटचा पराजय करून त्यांनी गाठला, आणि शिखांशी युध्दे होऊन १८४९ मध्ये चौथा टप्पा गाठून सारे काम पुरे झाले.

ब्रिटिशांना मद्रास शहरात येऊन तीनशे वर्षे झाली.  बंगाल, बिहार वगैरे भागात १८७ वर्षे झाली; दक्षिणेतील सत्ता त्यांनी १४५ वर्षांपूर्वी वाढविली.  संयुक्तप्रांत, मध्यप्रांत आणि पश्चिम हिंदुस्थान यांत सत्ताधारी होऊन १२५ वर्षे झाली आणि पंजाबात शिरून ९५ वर्षे झाली (१९४४ च्या जूनमध्ये मी हे लिहीत आहे.)  लहान क्षेत्रफळाचे महत्त्व बाजूला ठेवू.  बंगाल आणि पंजाब यांच्यावरील ताब्यात जवळजवळ १०० वर्षांच अंतर आहे.  या शतकात ब्रिटिशांचे धोरण आणि राज्यकारभाराच्या पध्दती यांत वारंवार फरक झाले आहेत.  इंग्लंडमध्ये होणार्‍या नवनवीन घटनांमुळे, फेरबदलामुळे आणि हिंदुस्थानातही ब्रिटिश सत्तेच्या दृढीकरणामुळे हे फेरफार होत असत.  जो जो नवीन प्रदेश जिंकला जाई, जोडला जाई त्याच्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप या फेरबदलाप्रमाणे असे.  तसेच ज्या राज्यकर्त्यांना ब्रिटिशांनी पराभूत केले त्यांची राजवट असेल त्या मानाने तेथील धोरण व व्यवस्था ठरे.  उदाहरणार्थ, ज्या बंगालमध्ये त्यांना अनायासे स्वस्तात विजय मिळाला त्या बंगालमधील जमीनदार मुसलमानवर्ग हे सत्ताधारी मानले जात असत.  म्हणून त्यांची सत्ता मोडणे हे तेथील धोरण ठरे. उलट पंजाबात शिखांपासून सत्ता हस्तगत केल्यामुळे तेथे ब्रिटिश आणि मुसलमान यांच्यात आरंभाला तरी वैरभाव, फारसा हेवादावा नव्हता.  हिंदुस्थानच्या बर्‍याचशा भागात मराठे हेच ब्रिटिशांचे वैरी होते.

एक गोष्ट लक्षात येते ती ही की, जे भाग ब्रिटिशांच्या अधिसत्तेखाली जास्तीत जास्त राहिले, ते आज जास्तीत जास्त दारिद्री आहेत.  ब्रिटिश सत्तेची दीर्घता आणि तद्‍नुषंगिक वाढते दारिद्र्य यांचा दाट संबंध दाखविणारा आलेखही खरोखर काढता येईल.  काही थोडी मोठी शहरे किंवा काही नवीन औद्योगिक टापू एवढ्याने या सर्वसाधारण सिध्दान्ताला विशेषसा बाध येणार नाही.  बजहुजनसमाजाची दशा काय आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे, व या दृष्टीने बंगाल, बिहार, ओरिसा आणि मद्रासचे काही भाग हे हिंदुस्थानातील सर्वांत दरिद्री भाग आहेत, यात शंका नाही.  सर्वसाधारण जनतेच्या राहणीचे प्रमाणे पंजाबमध्ये अधिक श्रेष्ठ आहे.  ब्रिटिश येण्यापूर्वी बंगाल खरोखरच अतिसंपन्न आणि समृध्द भरभराटलेला प्रांत होता.  पूर्वीची व आजची स्थिती यांतील स्थित्यंतर व विरोध याला अनेक कारणे असतील.  परंतु जो बंगाल धनंतर आणि भरभराटलेला होता तो लोकशाही कारभार शिकविणार्‍या आणि हिंदुस्थानची स्थिती सुधारण्यासाठी आम्ही झटतो असे म्हणणार्‍या ब्रिटिशांच्या १८७ वर्षांच्या प्रयोगानंतर आज अत्यंत दरिद्री व कंगाल होऊन तेथील लोक दैन्यदारिद्र्यात लडबडलेले, अर्धपोटी, उपाशी का मरत आहेत या गोष्टींचा उलगडा करणे महादुरापास्त आहे.

« PreviousChapter ListNext »