Bookstruck

प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 17

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

या सर्व मर्यादा, हे अडथळे, ही बंधने यांची आम्हाला पूर्वीपासून जाणीव होती, दखलगिरी होती.  परिस्थितीत मूलगामी फरक झाल्याशिवाय आपण फारसे करू शकणार नाही याची आम्हाला स्वच्छ कल्पना होती, आणि म्हणून तर स्वातंत्र्यासाठी आम्ही तहानलेले आहोत, अधीर झालो आहोत.  परंतु सर्व बंधने लक्षात ठेवूनही काही प्रगती करता येईल का हे पाहावे म्हणून आम्ही मंत्रिमंडले बनवली होती.  इतर देश प्रगती करीत झपाट्याने पुढे जात होते.  आम्हांसही प्रगतीची उत्कंठा होती.  प्रगतीसाठी आम्हीही वेडे झालेलो होतो.  आमच्या डोळ्यांसमोर अमेरिका येई, इतरही पूर्वेकडील काही देश येत. ते कसे पुढे जात आहेत असे मनात येई.  परंतु सोव्हिएट रशियाचे उदाहरण सर्वांच्यापेक्षा अधिकच उत्कटत्वाने आमच्यासमोर उभे राही.  वीस वर्षांच्या अल्पकाळात अंतर्गत झगडे आणि युध्दे असूनही, केवळ अनुल्लंघनीय असे अडचणीचे पर्वत समोर असतानाही केवढी कल्पनातीत प्रगती त्याने करून घेतली.  आमच्यातील काही कम्युनिझमकडे ओढले गेले; कोणी ओढले गेले नाहीत.  परंतु शिक्षण, संस्कृती, आरोग्य, वैद्यकीय उपाय आणि उपचार यांची सर्वत्र तरतूद, शारीरिक संवर्धन, अनेक छोट्या छोट्या राष्ट्रांचा प्रश्न सोडविणे इत्यादी क्षेत्रातील रशियाच्या कामगिरीमुळे सर्वांना कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही.  जुन्या जगाच्या घाणीतून नवीन जग निर्माण करण्याची रशियाचे अचाट आणि विराट उद्योग पाहून कोण तोंडात बोटे घालणार नाही ?  अतिव्यक्तिवादी रवीन्द्रनाथांनीही माथा तुकविला.  कम्युनिस्ट पध्दतीतील काही गोष्टींचे त्यांना आकर्षण वाटले नाही तरीही या नवसंस्कृतीचे ते उद्‍गाते झाले; आणि स्वत:च्या देशातील वर्तमान स्थितीशी रशियन प्रगतीची त्यांची तुलना केली.  मरणशय्येवरून त्यांनी जो अखेरचा संदेश दिला त्यातही रशियाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला आहे.  ''रोग आणि निरक्षरता यांच्याशी झगडताना रशियाने आपली सारी शक्ती खर्चिली; आणि निरक्षरता, दारिद्र्य यांचे उच्चाटन करण्यात प्रचंड देशातील, एका विशाल खंडातील जनतेच्या तोंडावरील दीनवाणेपणा संपूर्णपणे पुसून टाकण्यात रशियाने हळूहळू यश मिळविले.  नाना वर्गावर्गातील, धार्मिक पंथोपपंथांतील क्षुद्र भेदाभेदांपासून रशियन संस्कृती संपूर्णपणे मुक्त आहे.  रशियाने केलेल्या या आश्चर्यकारक प्रगतीने-थोड्या कालावधीत केलेल्या प्रगतीने- मी सुखावलो आणि मला हेवाही वाटला.  माझ्या आजूबाजूला लहानमोठी शेदोनशे राष्ट्रे आहेत.  काही वर्षांपूर्वी प्रगतीच्या फार दूरदूरच्या टप्प्यावर ती उभी होती.  परस्परांच्या प्रगतीत खूप अंतर होते.  परंतु आज ती सारी शांतीने, एकदिलाने प्रगती करीत पुढे जात आहेत आणि माझे डोळे माझ्या देशाकडे अखेर वळतात.  अत्यन्त सुधारलेला असा हा देश होता.  येथे बुध्दी होती.  सारे होते.  परंतु तो हा देश आज केवळ रानटी अवस्थेप्रत चालला आहे.  दोन प्रकारच्या शासनतंत्रांतील विरोध माझ्या डोळ्यांत भरतो.  एक सहकार्यावर उभारलेली शासनपध्दती आणि शोषणावर उभारलेली दुसरी राज्यपध्दती.  या दोन विभिन्न राज्यपध्दतींमुळे ही विभिन्न स्थिती शक्य होते.''

इतर राष्ट्रे जर अशी पुढे जातात, मग आपण का नाही जाणारी ?  आमच्या पात्रतेवर, बुध्दीवर, प्रयत्न करण्याच्या इच्छाशक्तीवर, सहनशक्तीवर आणि यशस्वी होण्यावर आमची श्रध्दा होती अडचणींची आम्हाला जाणीव होती.  दारिद्र्य, मागासलेपणा, प्रतिगामी पक्ष आणि गट, आमच्यातील मतभेद यांची आम्हाला कल्पना होती.  तरीही वाटले की यांना तोंड देऊ आणि यशस्वी होऊ.  किंमत फार मोठी द्यावी लागेल याची जाणीव असूनही ती द्यायला आम्ही सिध्द झालो.  कारण रोजच्या रोज आज आम्ही जी किंमत देत आहोत तिच्याहून अधिक किंमत कोठली द्यावी लागणार होती ?  परंतु अंतर्गत प्रश्न सोडवायला आरंभ कसा करायचा ?  जर पदोपदी ब्रिटिश सत्तेचा आणि ताब्याचा बहिर्गत प्रश्न सारखा समोर येईल, विरोध करील आणि आमचे प्रयत्न मातीमोल करील, धुळीत मिळवील ?

« PreviousChapter ListNext »