Bookstruck

प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 35

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ह्याखेरीज इतर कोणत्याही प्रसंगी गांधीजींनी हा वाद काँग्रेसमध्ये काढला नाही.  ह्यानंतर सर स्टॅफर्ड क्रिप्स आपली योजना पुढे मांडण्याकरता आले तेव्हा अहिंसेचा प्रश्नच निघाला नाही.  त्यांच्या योजनेचा विचार केवळ राजकीय दृष्ट्या करण्यात आला.  त्यानंतर ऑगस्ट सन १९४२ पूर्वीच्या काही महिन्यांच्या कालात गांधीजींच्या राष्ट्रप्रेमामुळे व त्यांना स्वातंत्र्याचा ध्यास लागलेला असल्यामुळे, गांधीजींनी ताबडतोब स्वातंत्र्य मिळून स्वतंत्र राष्ट्र या नात्याने वागण्याची मुभा हिंदुस्थानला मिळत असली तर काँग्रेसने या युध्दात भाग घेण्यास देखील आपली संमती दिली.  वैयक्तिक दृष्ट्या त्यांच्यापुरते पाहिले तर त्यांच्या भूमिकेत झालेले हे स्थित्यंतर फार मोठे, फार आश्चर्य करण्यासारखे होते, व त्यात त्यांच्या मनाला फार क्लेश पडले असणार, अंतर्यामी त्यांना मोठे दु:ख झाले असणार.  त्यांना जीव की प्राण, त्यांच्या जीवनाचे सारसर्वस्व झालेले अहिंसातत्त्व एका बाजूला, तर ज्याकरिता त्यांनी आपले रक्त आटवले होते, ज्याचा त्यांनी सारखा ध्यास घेतला होता ते हिंदुस्थानचे स्वातंत्र्य दुसर्‍या बाजूला अशा या ओढाताणीत अखेर त्यांचा झोक स्वातंत्र्यप्राप्तीकडेच गेला.  परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांची अहिंसेवरची श्रध्दा ढळली.  अर्थ इतकाच की चालू युध्दात काँग्रेसने त्यांचे अहिंसातत्त्व आणले नाही तरी त्यालाही त्यांची हरकत नव्हती.  ज्या तत्त्वाचा साक्षात्कार आपल्याला ईश्वरी प्रेरणेने झाला अशी आपली श्रध्दा, त्या तत्त्वाशी आपण यत्किंचितही प्रतारणा करणार नाही असा अत्याग्रह गांधीजींच्या अंगी बाणला होता.  पण त्याबरोबरच राजकारणात तारतम्य पाहून वागण्याचा व्यवहारीपणाही त्यांच्या अंगी होता.  या प्रसंगी गांधीजींच्या या गुणांच्या जोडीपैकी मुत्सद्दयाने महात्म्यावर मात केली.

गांधीजींच्या मनात या प्रकारे भिन्न वृत्तींचा परस्पर विरोधी लढा पुष्कळ वेळा चालतो व त्यामुळे त्यांच्याकडून उलटसुलट प्रकार घडतात आणि त्याचा माझ्या स्वत:च्या मनावर व कार्यावर विशेष निकट परिणाम होतो.  हे लढे पाहताना व त्यासंबंधी विचार करू लागले म्हणजे लिडेल हार्टच्या ग्रंथातील एका उतार्‍याची मला आठवण येते.  ''मानवी जीवनाच्या इतिहासातील घटनांची कारणे पाहू गेले तर सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे एकाच्या मनाचा दुसर्‍याच्या मनावर पडलेला प्रभाव.  या प्रभावासंबंधी जे काही कूट प्रश्न निघतात त्यात अप्रत्यक्ष मार्गाने परिणाम होण्याची कल्पना वारंवार येते.  परंतु ह्या अप्रत्यक्ष मार्गाच्या कल्पनेला विसंगत असा दुसरा एक शहाणपणाचा विचार येतो तो असा की कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर सापडण्याचा किंवा शोधण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे ह्या मार्गाने कोठे पोचू व त्याचा परिणाम कोणावर काय होईल असा पक्षपात न करता सरळ तर्कशुध्द मार्गाने सत्याची वाट चालावी.

''ईश्वरी प्रेरणेने प्रतीत झालेल्या सत्-तत्त्वांचा संदेश जगाला सांगणार्‍या 'प्रेषितां'नी मागवी प्रगतीत किती महत्त्वाचे कार्य केले आहे याची साक्ष इतिहासातून सापडते.  आपल्याला ज्या सत्-तत्त्वाचे दर्शन झाले ते जसेच्या तसे जगाला सांगणे हेच शेवटी व्यावहारिक दृष्ट्याही अत्यंत हिताचे आहे हेही यावरून सिध्द होते.  परंतु इतिहास पाहिला तर असेही स्पष्ट दिसते की, या दृष्ट्या महात्म्यांना जे सत्-तत्त्व प्रतीत झाले ते जगाला पटवून देऊन त्याचा प्रसार करण्याचे कार्य दुसर्‍याच प्रकारच्या एका वर्गावर अवलंबून आहे.  हा दुसरा वर्ग म्हणजे 'मानवजातीचे नेते'.  ज्यांना ते सत्-तत्त्व व ते ग्रहण करण्याची लोकांची पात्रता यांचा परस्परसंबंध लक्षात घेऊन काही एक मध्यम मार्ग काढावा लागला व त्याकरिता तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सिध्दान्तांची यथायोग्य मांडणी करावी लागली.  या नेत्यांना स्वत:लाच ती सत्-तत्त्वे कितपत ग्रहण करता आली व ती लोकांना समजावून सांगताना त्यांनी व्यावहारिक सुज्ञपणा किती दाखवला यावर ह्या नेत्यांच्या कार्याचे याशापयश बव्हंशी अवलंबून होते.

« PreviousChapter ListNext »