Bookstruck

प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 65

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गांधीजी वयस्क होत चालले होते, त्यांची सत्तरी उलटलेली, आणि शरीराने व मनाने सारखा अव्याहत उद्योग, सतत काबाडकष्ट करता करता त्यांचा देह थकून क्षीण झाला होता.  पण त्यांचा मानसिक उत्साह अद्यापही चांगलाच होता, आणि त्यांना वाटे की, आलेल्या परिस्थितीला आपण शरण गेलो, आपण इतकी वर्षे जे सारसर्वस्व म्हणून सर्वांत अधिक मोलाचे मानले ते सार्थ करून दाखविण्याकरिता बोटसुध्दा उचलले नाही तर आपले आजवरचे जन्माचे कार्य फुकट जाईल.  हिंदुस्थान व हिंदुस्थानासारखेय अन्यायाने नागवले गेलेले जे जे देश, जी जी राष्ट्रे असतील त्या सर्वांना स्वातंत्र्य मिळावे हे गांधीजींना इतके प्रिय होते की, ह्या त्यांच्या स्वातंत्र्यप्रीतीने त्यांच्या अहिंसाव्रतावर मात केली.  देशाच्या संरक्षणाकरिता किंवा तसा प्रसंगच आला तर राज्यकारभार सुरळीत चालविण्याच्या कार्यात अहिंसेचे व्रत तात्पुरते बाजूला पडले तरी चालेल या विचाराला त्यांनी पूर्वी संमती दिली होती ती कुरकुरत व आढेवेढे घेता घेता दिलेली होती, पण अहिंसेला बाध येईल अशा कोणत्याही उपक्रमापासून ते व्यक्तिश: अलिप्त राहिले होते.  हिंदुस्थान व ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रे यांच्या दरम्यान काही तडजोड निघण्यास ह्या आपल्या स्वत:च्या गुळमुळीत धोरणामुळे आडकाठी येण्याचाही संभव आहे असे त्यांना वाटू लागले.  तेव्हा त्यांनी तटस्थपणा सोडून स्वत:च काँग्रेसच्या एका ठरावाचा पुरस्कार केला.  तो ठराव असा की, 'स्वतंत्र हिंदुस्थानचे राज्य चालविण्याकरिता म्हणून एक तात्पुरते सरकार जर निर्माण करण्यात आले तर त्या हिंदुस्थान सरकारचे मुख्य काम, आक्रमणाचा प्रतिकार करण्याकरिता व स्वातंत्र्याकरिताच या युध्दात आपल्या देशाची सारी विशाल साधनसामग्री उपयोगी आणणे व हिंदुस्थान सरकारच्या सशस्त्र सैन्याचा आणि शिवाय असतील त्या सर्व साधनांचा उपयोग करून त्यांच्याद्वारे संयुक्त राष्ट्रसंघाशी सहकार्य करून हिंदुस्थानचे संरक्षण करणे, हेच राहील.'  अशा तर्‍हेने स्पष्ट शब्दात स्वत:ला बांधून घेण त्यांना सोपे नव्हते, पण त्यांच्या अहिंसाव्रताच्या दृष्टीने काही वेगळाच वास येणारी ही कडू गोळी त्यांनी कशी तरी गिळली.  चालून येणार्‍या परचक्राला, कोणाला दास म्हणून नव्हे तर स्वतंत्र राष्ट्र म्हणून, हिंदुस्थानने प्रतिकार करावा असे शक्य होईल अशी काही तडजोड निघावी ही त्यांची इच्छा इतकी अनावर झाली होती की, त्यापायी त्यांनी ते देखील केले.

आमच्यापैकी काहीजणांचे गांधीजींशी तात्विक व इतर मतभेद अनेक वेळा येत गेले होते ते बहुतेक सारे मतभेद या वेळी नाहीसे झाले, परंतु मुख्य अडचण आम्हाला पडली होती ती अशी की, आम्ही काही उपक्रम करायला गेलो तर त्यामुळे युध्दकार्यात व्यत्यय येईल व ती तशीच कायम राहात होती.  ब्रिटिश सरकारशी काही तडजोड काढणे शक्य आहे अशी अद्यापही गांधीजींची समजूत थोडीफार होतीच व त्या आशेवर त्यांनी स्वत: या बाबतीत शक्य ते करून पाहतो असे आम्हाला सांगितले तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटले.  आणि ह्या आशातंतूला गांधीजी चिकटून राहिले म्हणूनच त्यांनी देशात सरकारविरुध्द काही तरी चळवळ सुरू करण्याविषय खूप ऊहापोह आपल्या भाषणातून चालविला होता तरी तो अगदी मोघम होता, चळवळीचे नक्की स्वरूप त्यांनी सांगितले नव्हते किंवा आपल्या मनात काय करावयाचे आपण ठरविले आहे त्याचा पत्ता लागू दिला नव्हता.

आम्ही अशा प्रकारे शंकाकुशंका काढून इकडे वाद चालविला होता, तर तिकडे हिंदुस्थानभर देशातल्या लोकांची वृत्ती पालटून गेली होती, मनातला राग मनात ठेवून लोक आजवर घुमेपणाने स्तब्ध राहिले होते, पण आता त्यांचा क्षोभ व आतुरता अनावर झाली होती.  काँगेस काही निर्णय व ठराव करो वा न करो, तेवढ्याकरिता जे व्हायचे ते काही थांबून अडून बसले नव्हते.  गांधीजींच्या वक्तव्यांनी जनमनाला चालना मिळून जनता जागेवरून हालली होती, ती आता त्यामुळे आपल्याच वेगाने पुढे चालली.  गांधीजींच्या वक्तव्यातला आशय बरोबर होता की नाही ही गोष्ट वेगळी, पण त्या वेळी लोकांच्या जे मनात होते तेच गांधीजींनी व्यवस्थित शब्दात बोलून दाखविले हे मात्र नक्की.  जनता बिथरून गेली होती, जे होईल ते होईल पण आपण काहीतरी साहस करणे भाग आहे अशी जनतेची वृत्ती झाली होती, भावनेच्या भरापुढे विवेक, शुध्द युक्तिवाद, परिणामाचा शांत विचार हे सारे बाजूला पडले होते.  चळवळ केली तर परिणाम काय होईल याची काही कल्पना येत नव्हती असे नाही, आपण जे करायला जाऊ ते साधी किंवा न साधो, त्यापायी भूर्दंड म्हणून खूप यातना व हानी सोसावी लागेल याची जाणीव होती.  पण पुढच्या अनिश्चितीने आज ज्या मानसिक यातना दररोज भोगाव्या लागत होत्या त्यांचेही माप काही थोडेथोडके भरत नव्हते आणि त्या यातनांतून पुढे सुटण्याचे काहीही लक्षण दिसत नव्हते.

« PreviousChapter ListNext »