Bookstruck

शशी 6

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मास्तरांनी एकदम गाडी सोडली.

“हळू सांगा जरा. शेंदरीच्या पुढे काय?” एकाने विचारले.

“पुढे लाल रे-” दुसरा म्हणाला.

“हा लाल! त्याच्यापुढे लाल का? तुझे गालच लाल करतो!” असे म्हणून आपल्या वरदहस्ताचा स्पर्श करून मास्तरांनी मुलाच्या मुखपुष्पास लाल केले.

श्रीविष्णूंनी ध्रुवबाळाच्या गालाला स्पर्श केला व त्याला वेद म्हणावयाला लाविले, गुरुदेवांनी हस्तस्पर्श करून मुलाला रडायला लाविले!

“उद्गारचिन्ह कसे! ते कोठे शिकविले आहे?” एकाने विचारले.
“आजळी गेला असशील केळी खायला शिकविले तेव्हा! गैरहजर रहायला हवे. उद्गारचिन्ह काठीखाली टिंब. काठीच्या खाली टिंब. समजले आता?” असे म्हणून विचारणा-याच्या पाठीत त्यांनी एक काठी मारली. मुलाच्या डोळ्यांतील अश्रूंची टिंबे पाटीवर पडू लागली व शुद्धलेखन वाहून जाऊ लागले.

“डोळे पूस आधी. पूस डोळे- ते पुसून चालले सारे.” असे बजावून मास्तरांनी आणखी छड्या गप्प बसण्यासाठी म्हणून लगावल्या! मुलगा पहिले अश्रू पुशी, तो दुस-या काठीचे पुनः नव्याने येत.

शुद्धलेखनाच्या तासाला मुले कंटाळली. मास्तरही मारून कंटाळले. ते आता हिशेब घालू लागले.
“एका आण्याला सात केळी,” मास्तर हिशेब सांगू लागले. एक माळ्याचा मुलगा होता, तो म्हणाला, “हल्ली स्वस्त आहेत केळी; माझी आई आण्याला नऊ देते.”

मास्तर म्हणाले, “अरे, येथे का खायची आहेत? बाजारात किती का असेनात. एका आण्याला सात, तर पावणेदोन आण्यांची किती? लौकर करा व पाटीवर लिहून पाटी उघडी टाका!”

मुले हिशेब करू लागली. एका मुलाने विचारले, “एका रुपयाची सांगा ना? तो हिशेब पटकन् होईल. का दोन आण्यांची लिहू?”

« PreviousChapter ListNext »