Bookstruck

शशी 16

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

आई : आईबापांचे ऐकत नाही, तो देवाला कसा आवडेल!

शशी : प्रल्हाद आणि ध्रुव नव्हते का आवडत! ध्रुवाची मला गोष्ट फार आवडते. मी जाऊ का ग ध्रुवासारखा रानात! मला भेटेल का ग देव!

आई : अंथरुणात जाऊन नीज जा आता. सकाळी शाळेत जायचे आहे जा.
शशी अंथरुणात जाऊन पडला. देव तरी मला जवळ घेईल का! हा विचार करीत तो झोपी गेला.

हरदयाळ घरात आले होते. ‘निजला वाटत शश्या!’ त्यांनी विचारले. निजला. अगदी बाई वेडे पोर हो! म्हणे मी गोवारी होऊ का!”पार्वतीबाईंनी सांगितले. “त्याच्या नशिबी नांगर-बैल, कुदळ-फवाडे हेच आहे. सुखाची नोकरी त्याच्या नशिबी नाही. पाटीवर कधी गायीचे चित्र काढील. मोर काढील. आपण तरी काय करणार! त्याच्या कफाळी असेल ते थोडेच टळणार आहे!” हरदयाळ विरक्तपणे म्हणाले.

“आई, मला खऊ देतेस! माझी शाळेत जाण्याची वेळ झाली.” शशीने आईला विचारले.

आई : रोज कुठून रे खाऊ द्यायचा! खाऊ हवा, पण लक्ष लावून शिकायला मात्र नको.

शशी : आई दे ना ग. उद्या नाही मागणार.

आई : त्यातली दोन बिस्किटे घे जा. दोनच घे.
शशीने फडताळात पुंडा होता, त्यांतील दोन बिस्किटे घेतली. ती खिशात घालून तो शाळेत निघाला.

आई : शशी ती बिस्किटे खाऊन शाळेत जा. खिशात घालून नाही जायचे.

शशी : आई. मी शाळेत खाईन.    

आई : शाळेत कशाला? इतर मुले तेथे असतात. वेडाच आहेस तू. घरी खाऊन जावे.

शशी
: आई तू सांगतेस म्हणून एक खातो व एक शाळेत नेईन.

आई
: दोन्ही इथेच खाल्ली पाहिजेत. नाहीतर उद्यापासून खाऊ देणार नाही बघ.

« PreviousChapter ListNext »