Bookstruck

शशी 29

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्या दिवशी विलासपूरची यात्रा होती. लक्ष्मीनारायणाचे मंदिर शृंगारण्यात येत असे. आजूबाजूस शेकडो दुकाने बसत. लाकडी पाळणे, लाकडी घोडे कुरूकुरू फिरत असत. हजारो लोक यात्रेस जमत. रघू व मिठाराम यांना त्यांच्या आईने चार-चार आणे यात्रेसाठी दिले. शशीला एकच आणा मिळाला. शशी आत्याला म्हणाला, “मला पैसे नकोत.”

आत्या रागाने म्हणाली, “मोठा अभिमानी ! घे तो एक आणा. नको असायला काय झाले ! मुलाची जात, दिले की घ्यावे. एवढासा आहे, परंतु ऐट कोण मेल्याची !”

शशीने तो एक आणा घेतला. मिठाराम शशीला म्हणाला, “शशी माझे-तुझे पैसे एकत्रित करू. तुला आवडेल ते मी घेईन. चल शशी आपण दोघे बरोबर जाऊ. दादाला जाऊ दे एकटाच.”

शशी व मिठाराम दोघे बरोबर यात्रेला गेले. रघू एकटाच पुढे गेला होता. त्याला दुसरे मित्र वाटेत भेटले, रघूने एक चेंडू घेतला, एक फुगा विकत घेतला आणि एक आण्याचे साखर फुटाणे घेतले. अशा रीतीने रघूने आपले चार आणे दवडले. त्याने देवाचे दर्शन घेतले नाही. फुटाणे खात तो घरी आला व चेंडू खेळत बसला.

खूप गर्दी होती शशी व मिठा एकमेकांचे हात धरून चालले होते, एके ठिकाणी एक आंधळी बाई व तिचा मुलगा अशी होती. ती आंधळी सखुबाईचे गाणे म्हणत होती:
मारीत कुटीत, घरास आणिली।
बोबडी वळली, सखूबाईची।।
तिघे जी मिळून विचार तो केला।
अन्न उदक हिला, देऊ नये।।
च-हाटे घेऊन, खाबांसी बांधिली।
च-हाटे बुडाली, मांसामध्ये।।  
सखूबाई म्हणे कळा या लागल्या।
हेतु रे गुंतला तुझ्या पायी।।
सखूबाई म्हणे, पंढरीच्या राया।
अंतरले पाया चांडाळीण।।


असे ते गाणे चालले होते. शशीला जणू स्वतःचेच हाल आठवत होते ! शशीने ते गाणे ऐकिले व त्या बाईला तीन दिडक्या दिल्या. मिठाराम शशीला म्हणाला “ती एक दिडकी कशाला ठेवलीस !” शशी म्हणाला, ‘तो देवापुढे ठेवायला. देवापुढे रिकाम्या हातांनी जाऊ नये.’ मिठाराम म्हणाला, “शशी, मी काय घेऊ ! या चार आण्यांचे काय घेऊ? सांग.” शशी म्हणाला, “मी काय सांगू, मिठा, तुला आवडेल ते घे.” मिठाराम म्हणाला, “असे रे काय करतोस ! सांग ना रे शशी ! मी ध्रुव-नारायणाची तसबीर घेऊ? तुला ध्रुवाची गोष्ट आवडते. घेऊ !” शशी म्हणाला, “घे.”
ते दोघे एका तसबीरविक्याकडे आले.

« PreviousChapter ListNext »