Bookstruck

शिरीष 5

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

परंतु ही कसली तिकडे गडबड ! घो़डेस्वार दौडत आहेत. टापटाप आवाज येत आहेत. सारे घाबरले. गाणे संपले. आनंद अस्तास गेला. तो पाहा एक दिवा मालवला आणि चंद्रही खाली वळला. अंधार होणार वाटते !

‘काय रे शिरीष, काय आहे ?’ पित्याने विचारले.

‘राजाचे दूत आहेत. प्रांताधिपतीकडून आले आहेत. हे पाहा आदेशपत्र.’

सुखदेवाने ते आदेशपत्र वाचले. शिरीषची मागणी करण्यात आली होती. राजाच्या कानावर शिरीषचे नाव गेले होते. प्रांताधिपतीने शिरीषला पाठवले नाही, म्हणून राजा यशोधर रागावला होता. प्रांताधिपतीने ताबडतोब शिरीषला आणण्यासाठी घोडेस्वार पाठवले होते.

‘चला निघा !’ आलेला नायक म्हणाला.

‘एकुलता एक मुलगा नेऊ नका.’ पिता म्हणाला.

‘आम्ही पिकली पाने झालो. नको नेऊ म्हाता-यांची काठी !’ सावित्रीबाई म्हणाली.

‘त्यांना न्याल तर मी कोठे जाऊ !’ करुणा म्हणाली.

‘तुम्ही सारी रडता का ? तुमचे दैव थोर आहे. ह्या शिरीषला राजा प्रधान करील. वेडी दिसता तुम्ही !’ तो नायक हसून म्हणाला.

‘आजची रात्र तरी नका नेऊ. आज शिरीषच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होत आहे. आजीची रात्र तरी आनंदात जाऊ दे. उद्या न्या. म्हाता-याचे ऐका.’ सुखदेव रडत म्हणाला.

‘बरे सकाळी नेऊ. सकाळी मात्र आढेवेढे चालणार नाहीत. ब-या बोलाने शिरीष येणार नसेल, तर मुसक्या बांधून त्याला न्यावे लागेल. तुम्ही त्याचे नाव लपवून ठेवलेत. प्रांताधिपती चिडला आहे. आता तरी तुम्ही मूर्खपणा करु नका.’

« PreviousChapter ListNext »