Bookstruck

*राजधानीत 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘तुम्हाला नाही त्याचे उत्तर देता येत?’

‘नाही.’

‘तिकडे पहिले आलेत; परंतु येथे हरलेत.’

‘हो हरलो. सांगा ना, का केलात नवस?’

‘तुम्हाला माहीत आहे. मी जाते. मैत्रिणी शोधीत येतील. आज रात्री या हो दीपोत्सव पाहायला. आमच्या घराजवळही या. आमच्या घरावरही आज शेकडो, हजारो दीप लागतील. तुम्ही तुमच्या हृदयातही लावा. माझ्या घराजवळ तरी लावा. लावाल ना?’

‘बघेन.’

‘मी जाते.’

‘ती गेली. शिरीष तेथेच होता. रात्र झाली. आकाशात लाखो दीप लागले आणि मुक्तापूर राजधानीतही आज लाखो दीप पाजळत होते. वसतीगृहातील विदयार्थी दीप-शोभा पाहण्यासाठी हिंडत होते. आसपासच्या खेडेगावांतून हजारो स्त्रीपुरुष आले होते. मुक्तापूर राजधानींने हजारो हिंरेमाणकांच्या माळाच जणू काय गळयात घातल्या होत्या. सुंदर, प्रसन्न देखावा!’

हेमा आपल्या प्रासादाच्या पाय-यांवर उभी होती. ती अलंकारांनी नटलेली होती. जणू देवतेप्रमाणे ती दिसत होती. गर्दी येत जात होती. हेमा कोणाची वाट पाहात होती?

तो पाहा शिरीष आला. हा पाहा एक दिवा विझला. हेमा दिवा लावू लागली. परंतु दिवा लागेना. तिने शिरीषकडे पाहिले.

‘शिरीष, ये. आपण दिवे लावू.’

‘दे, मी लावतो.’

शिरीषने दिवा लावला व जाऊ लागला.

‘शिरीष, दिवा विझू नको हो देऊ. राजधानीतील दिवे उद्या दिसणार नाहीत, परंतु हृदयात लागलेला दिवा कधी विझू नये...’ ती म्हणाली.

« PreviousChapter ListNext »