Bookstruck

शिरीष व हेमा 3

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘बाबा, तुम्हीही चला ना आमच्याबरोबर.’

‘हेमा, कर्तव्ये अनेक असतात.  कौटुंबिक कर्तव्ये तशी सामाजिक. मी जुना मंत्री आहे. एकदम कसा येऊ? आणि शिरीषने जाणेही योग्य नाही. राजाने त्याला प्रधान केले, ते का उगीच? प्रजेचे कल्याण नको का व्हायला? ज्याच्या ठिकाणी जो गुण आहे तो त्याने समाजासाठी दिला पाहिजे. हेमा, तू गेलीस तर मी दुःखी कष्टी होईन; परंतु मी येथेच राहीन. मोठे कर्तव्य करीत राहीन आणि शिरीषविषयी मी महाराजांस विचारणार नाही! शिरीषला प्रधानकीपासून मुक्त करा, असे मी कसे सांगू? हेमा, तू शिरीषची समजूत घाल. म्हणावे, वृद्धांना इकडे घेऊन ये, तसे नसेल करता येत तर इलाज नाही; परंतु प्रधानपद सोडून जाण्याचा हट्ट करु नकोस.’

हेमा दुःखीकष्टी झाली. ती जायला निघाली.

‘आता उशीर झाला आहे. हेमा, येथेच नीज.’

‘शिरीष वाट पाहील.’

‘अगं तू का कोठे रानात आहेस? इतकी काय एकमेकांची वेडी बनलीत?’

‘बरे हो बाबा, येथे झोपते.’

हेमा आज माहेरीच झोपली परंतु तिला झोप येईना. तिकडे शिरीषही तळमळत होता. आईबापाना कसे आणू? त्यांना आणायचे म्हणजे करुणेला नको का आणायला? माझे लग्न झाले आहे ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही. का बरे नाही सांगितली? मी हेमाला फसविले ; परंतु तिच्यावर माझे प्रेम आहे आणि करुणेवर का नाही? करुणेलाही मी विसरु शकत नाही. हेमा समोर असली, म्हणजे करुणा मनातून दूर होते; परंतु हेमा दूर जाताच करुणा सिंहासन पुन्हा बळकावते. करुणा तिकडे रडत असेल. कोण आहे तिला ?आई ना बाप. किती कोमल, प्रेमळ तिचे मन; परंतु ती कर्तव्य करीत असेल. माझ्या म्हाता-या आईबापांची सेवा करीत असेल. आणि मी ? काय करावे समजत नाही.

अंथरुणावर शिरीष तळमळत होता. पहाटे त्याला झोप लागली. बाहेर उजाडले. हेमा लवकर उठून घरी आली; परंतु शिरीष झोपलेलाच होता. ती शिरीषच्या बिछान्याजवळ उभी होती. पतीचे सुकलेले तोंड पाहून तिला वाईट वाटले. रात्रभर शिरीष तळमळत असेल असे तिने ताडले.


« PreviousChapter ListNext »